ऑटीझम म्हणजे नेमके काय? ह्याची लक्षणे कशी ओळखावीत?


दर वर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटीझम दिवस म्हणून साजरा होतो. अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये हा विकार आढळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हा एक न्युरो-डेव्हलपमेंटल विकार आहे. जगभरामध्ये दर ६८ मुलांमध्ये एक मूल ह्या विकाराने ग्रस्त आहे, आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या विकाराची लक्षणे बालपणापासूनच दिसू लागतात. ह्या विकाराने ग्रस्त असणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास, त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने धीम्या गतीने होत असतो.

हा विकार, मूल जन्मल्यापासून ते तीन वर्षांचे होईपर्यंत उद्भवत असल्याने त्या काळादरम्यान मुलांचा मानसिक विकास सामन्यपणे होऊ शकत नाही. मानसिक विकास बाधित झाल्याने ही मुले इतर सामान्य मानसिक विकास झालेल्या मुलांच्या मानाने वेगळी भासू लागतात. ऑटिस्टिक मुले, त्यांच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळण्यास कचरतात. तसेच कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना इतर मुलांच्या मानाने जास्त वेळ लागतो. ह्या मुलांचा बुद्ध्यांक इतर सामान्य मुलांच्या मानाने वेगळा असतो. काही ऑटीस्टिक मुले विलक्षण बुद्धिवान असतात. त्यांचा बुद्ध्यांक देखील सामान्य मुलांपेक्षा जास्त असतो, पण ह्या मुलांना बोलण्यात आणि इतर सामाजिक व्यवहारामध्ये अडचणी येत असल्याने इतर मुलांसारखी प्रगती, ही मुले करू शकत नाहीत.

ऑटीझम नेमका कोणत्या कारणामुळे उद्भवतो ह्याचे पक्के निदान अजूनही झालेले नसले, तरी जेनेटिक म्युटेशन हे त्यामागील एक कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण हे जेनेटिक बदल कशामुळे होतात हे मात्र ठामपणे सांगितले जाऊ शकत नाही. पर्यावरणातील अपायकारक बदलांमुळे देखील ऑटीझम उद्भवू शकते असे वैज्ञानिक म्हणतात. ऑटीझम हा मुलाच्या जन्मानंतर त्वरित होऊ शकणारा आजार आहे. गर्भावस्थेमध्ये असताना स्त्रीला काही आजार होणे, किंवा गर्भवती महिला सतत मानसिक तणावाखाली असणे, वेळेअगोदर प्रसूती होणे, थायरॉइड ग्रंथीचे काम सुरळीत नसणे, ह्या कारणांमुळे पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होऊन ऑटीझम उद्भवू शकते. क्वचित प्रसंगी गर्भातील बाळाला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने देखील ऑटीझमचा धोका उद्भवू शकतो.

जर लहान मुलांच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष दिले, तर जन्मापासून सहा महिने ते वर्षभराच्या आतच मुलाचा विकास सामान्य गतीने होतो आहे किंवा नाही हे समजू शकते. सर्वसाधारणपणे मूल वर्षाचे झाल्यानंतरही हसत नसेल, आईच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसेल, तर मुलाचा विकास सामान्य नसण्याची शक्यता असते. पण बहुतेक केसेस मध्ये मूल तीन-चार वर्षांचे होईपर्यंत त्याचा विकास सामान्य नाही, हे लक्षात येत नाही. पण जर विकासाची गती सामान्य नाही हे लवकर लक्षात आले, तर त्वरित मनोवैज्ञानिकांशी संपर्क करणे अगत्याचे असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment