कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी आवेदन करताना तुमचा बायोडेटा किंवा सीव्ही तुमची ओळख सांगत असतो. सीव्ही जर प्रभावी नसेल, तर नोकरीसाठी तुमची मुलाखत होण्याआधीच तुम्हाला नोकरी न देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता, तुम्ही आजवर मिळविलेले लहान मोठे यश, तुमची जबाबदारी घेण्याची आणि सक्षमपणे पेलू शकण्याची तयारी तुमच्या सीव्ही द्वारे दिसून येत असते. त्यामुळे तुमचा सीव्ही तयार करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
आपला सीव्ही इंग्रजीमध्ये बनवत असाल, तर त्यामध्ये व्याकरणाच्या आणि स्पेलिंगच्या चुका नसतील याची काटेकोरपणे काळजी घ्या. तुमचा सीव्ही तुमच्या आजवरच्या अनुभवाबद्दल माहिती देणारा असतो. तसेच तुमच्या या पूर्वीच्या कामाबद्दल आढावा देणारा असतो. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीसाठी आवेदन करणार असाल, त्या ठिकाणी तुमचा सीव्ही काळजीपूर्वक वाचला जात असतो. अश्यावेळी सीव्ही मध्ये व्याकरणाच्या किंवा स्पेलिंगच्या चुका असणे योग्य नाही.
सीव्ही तयार करताना त्यामध्ये अनेक तऱ्हेचे रंग किंवा फॉन्ट वापरणे टाळावे. तुमचा सीव्ही एकसंध, एक सारखा दिसला पाहिजे. सीव्हीमध्ये आपला कामाबद्दल अनुभव लिहिताना अवघड भाषा, किंवा बोजड शब्दांचा वापर करू नये. तसेच फार पाल्हाळ लावू नये. आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या, कामांच्या अनुभवांबद्दल मुद्देसूद लिहावे. सीव्ही मध्ये म्हणी, सुविचार यांचा वापर करणे अगत्याने टाळावे. सीव्हीमध्ये तुमच्या कामाचा अनुभव सांगणारी वाक्ये लांबलचक असू नयेत. वाक्यरचना साधी, सोपी आणि एका वाक्यात थोडे शब्द असणारी हवी. तुमचा सीव्ही बनविला जाताना भाषा जितकी साधी आणि समजावयास सोपी असेल, तितका तुमचा सीव्ही प्रभावी ठरेल. तसेच, आपल्या सीव्हीमध्ये आपण केलेल्या कामांचा किंवा पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांचे अवाजवी गुणगान करू नये.
आपला बायोडेटा (सीव्ही) असा बनवा प्रभावी
तुमची ज्या प्रकारच्या नोकरीकरिता अर्ज करणार असाल, त्या नोकरीचे स्वरूप लक्षात घेऊन आपला सीव्ही तयार करावा. त्या नोकरीशी निगडीत पात्रता, त्या संबंधित कामांचा आपला अनुभव, आणि जबाबदारी पेलण्याची तयारी यांचा आवर्जून उल्लेख करावा.