ग्लुकोज आणि अंड्याचा खुराक देऊन सापाची खास बडदास्त


ह्या सापाची कथा अतिशय अजब आहे म्हणायला हवे. ह्या सापासाठी खास बिछाना तयार करण्यात आला असून, त्याला नियमाने अंडी आणि ग्लुकोज असा खुराक ही दिला जात आहे. सापाची अशी खास बडदास्त का ठेवली जात आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, ही कथा एका जखमी झालेल्या सापाची आणि त्याची अवस्था पाहून हळहळलेल्या व त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका दयाळू स्त्रीची आहे.

हे कथा आहे छत्तीसगड मधील नया रायपुर या ठिकाणची. ही घटना भूतदयेचे उत्तम उदाहरण देणारी आहे. येथे राहणाऱ्या कौर परिवारातील सदस्यांनी ह्या जखमी सापाचे प्राण वाचवून मानवतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. हा साप कौर परिवारातील सदस्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. ह्या सापाला कौर परिवारजनांनी त्वरित पशु वैद्यकीय रुग्णालयामध्ये नेले. त्यानंतर सापावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निदान करण्यात आल्यानंतर कौर परिवाराने ह्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी आनंदाने उचलली. ही शस्त्रक्रिया करून सापाचे प्राण वाचवण्यात पशुवैद्यक तज्ञांना यश आले आहे.

ह्या सापाला उपचारांसाठी अवंती येथील पशुवैद्यक इस्पितळामध्ये भरती करण्यात आले होते. ह्या सापाच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करून आता ह्या सापाला आठवड्याभाराची बेड रेस्ट सांगण्यात आल्याने, सध्या ग्लुकोज आणि अंडी खायला देऊन ह्या सापाची खास काळजी घेतली जात आहे. कौर यांच्या घराच्या आसपास साप दिसल्याने तिथे जमलेल्या लोकांनी घाबरून जाऊन सापाला मारहाण केल्यामुळे साप जखमी झाल्याचे समजते. त्यानंतर मनजित कौर यांना हा जखमी साप पाहून त्याची दया आली, आणि त्यांनी उपचाराकरिता ह्या सापाला रुग्णालयात भरती केले. त्यानंतर सापाला भूल देऊन त्यावर शस्त्र क्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ४५ मिनिटे चालली.

Leave a Comment