आकाशातून नारिंगी बर्फवृष्टी होते तेव्हा…


आकाशातून नारिंगी बर्फवृष्टी होत असल्याची घटना तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली आहे का? पण रशिया मधील ‘सोची’ नामक ठिकाणी नारिंगी रंगाची बर्फवृष्टी होत असल्याची छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. सफेद रंगाचे बर्फ न दिसता, सर्वत्र नारिंगी बर्फाचे आच्छादन नजरेला पडत असल्यामुळे येथील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आश्चर्याला पारावार उरलेला नाही.

असा रंगीत बर्फ सध्या रशिया, बुल्गेरिया, युक्रेन, रोमेनिया आणि माल्दोव्हा या देशांमध्ये नजरेस पडत आहे. रशियातील सोची शहरामध्ये खास स्कीईंग किंवा स्नो बोर्डिंग करिता आलेले पर्यटक या रंगीत बर्फावृष्टिची छायाचित्रे सोशल मिडिया द्वारे शेअर करीत आहेत. सध्या येथे दिसणारे असे दृश्य फार दुर्मिळ असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. इथे होणाऱ्या बर्फवृष्टीचा रंग नारिंगी का असावा, या बद्दल हवामानतज्ञांनी त्यांचे तर्क लावले आहेत.

हवामान तज्ञांच्या नुसार, सहारा वाळवंटा मधून येणाऱ्या वाळूच्या किंवा धुळीच्या वावटळींमुळे किंवा वादळांमुळे ही वाळू, बर्फामध्ये किंवा पडणाऱ्या पावसामुळे मिसळली गेल्याने इथे होणारी बर्फवृष्टी नारिंगी रंगाची दिसत आहे. दर पाच वर्षांनंतर या प्रांतांमध्ये नारिंगी बर्फवृष्टी पहावयास मिळत असल्याचे समजते. पण अलिकडच्या काळामध्ये केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत नारिंगी बर्फवृष्टी दोन वेळा झाली असल्याचे बोलले जात आहे.

येथे राहणाऱ्या स्थानिय लोकांच्या मते, यंदा झालेल्या बर्फावृष्टीमध्ये वाळूचे प्रमाण लक्षणीय आहे. एरव्ही होणाऱ्या नारिंगी बर्फावृष्टीमध्ये वाळूचे इतके जास्त प्रमाण आढळून येत नाही. या वेळी झालेल्या बर्फवृष्टीमध्ये मात्र हे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा अधिक असल्याचे समजते. रशियातील रोसा खूतर नामक पर्वतराजीमध्ये असलेल्या रोसा खुतर नामक स्की रिसोर्ट मध्ये खास स्कीईंग करण्याकरिता आलेले लोक या बर्फवृष्टीने काहीसे त्रस्त आहेत. स्कीईंग करीत असताना बर्फाच्या सोबत वाळू देखील तोंडात शिरत असल्याची तक्रार पर्यटक करीत आहेत.

Leave a Comment