आता नोकरीच्या मुलाखती घेणार ‘वेरा’ रोबोट


नोकरीसाठी द्यावी लागणार असलेली मुलाखत ही प्रत्येक होतकरू तरुण किंवा तरुणीच्या दृष्टीने महत्वाची बाब असते. आपल्याला कश्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, आपल्याला सर्व प्रश्नांची योग्य आणि समाधाकारक उत्तरे देता येतील किंवा नाही, आपल्या व्यक्तिमत्वाची योग्य ती छाप मुलाखत घेणाऱ्यांवर पडेल किंवा नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नोकरी आपल्याला मिळेल किंवा नाही, या आणि अश्या अनेक शंका मुलाखत देणाऱ्याच्या मनामध्ये असतात.

आता या सर्व बाबींमध्ये मध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. आता रशिया देशामध्ये नोकरीसाठी मुलाखत घेण्याकरिता कुठलीही समिती नेमली जाणार नसून, अर्जदारांच्या मुलाखती चक्क एक रोबोट घेणार आहे. ‘वेरा’ नामक ही रोबोट अर्जदाराची मुलाखत घेऊन त्याला ‘ हायर ‘ करायचे की ‘ फायर ‘ करायचे याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे. अलीकडेच एका रशियन स्टार्ट-अप ने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच रोबोट ची मदत घेऊन कंपनीमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

स्ताफोरी नामक रशियन कंपनीने अर्जदारांच्या मुलाखती घेण्यासाठी ‘वेरा’ नामक रोबोटची नेमणूक केली आहे. वेरा, पेप्सिको आणि लोरेआल सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये ही अर्जदारांच्या मुलाखती घेत आहे. ह्या वेरा रोबोटचे निर्माण, ह्युमन रीसोर्सेस विभागाच्या अलेक्झांडर युराक्सीन आणि व्लादिमिर शेजनिकोव्ह यांनी केले आहे. हे दोघे जण स्ताफोरी कंपनीचे को-फाऊंडर आहेत. ह्या दोघांच्या मते ह्युमन रिसोर्सेस ह्या विभागातील पुष्कळसे काम रोबोट्सना करता येण्यासारखे आहे. ही बाब लक्षात घेऊन या दोघांना ‘ वेरा ‘ चे निर्माण करण्याची कल्पना सुचली. सध्या स्ताफोरी कंपनीकडे तीनशेच्या वर क्लायन्ट्स आहेत.

कंपनीसाठी योग्य व्यक्तींचे चयन करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च होणारा पैसा लक्षात घेता वेरा रोबोटची मदत घेणे अतिशय सोयीस्कर झाल्याचे, हा रोबोट तयार करणाऱ्यांचे मत आहे. ह्या रोबोटमध्ये असणारे सॉफ्ट वेअर एकाच वेळी अनेक लोकांच्या मुलाखती घेण्यास सक्षम आहे. ही वेरा रोबोट नोकरदाराला ‘हायर’, म्हणजेच कामावर ठेऊन घेण्यापासून ते ‘फायर’ , म्हणजेच कामावरून हकालपट्टी करण्यापर्यंत सर्व कामे लीलया करू शकणार आहे.

Leave a Comment