आहारामध्ये इडली अवश्य करा समाविष्ट


कर्बोदके आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणजे इडली हा पदार्थ. उडदाची डाळ आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून बनविला जाणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेकांच्या आवडीचा असून, आरोग्यासाठी देखील अतिशय फायद्याचा आहे. तीस मार्च हा दिवस ‘ वर्ल्स इडली डे ‘ म्हणून साजरा केला गेला. दक्षिण भारतातील हा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणारा पदार्थ उडीद डाळ आणि तांदूळ यांचे मिश्रण वाटून घेऊन, ते साच्यांमध्ये घालून व वाफवून तयार केला जातो. हा पदार्थ, चवदार आणि पौष्टिक सांबार आणि निरनिराळ्या चविष्ट चटण्यांच्या सोबत खाल्ला जातो. वर्ल्ड इडली डे च्या निमित्ताने असंख्य इडली प्रेमींनी आपल्या आवडीच्या पदार्थाचे भरपूर गुणगान सोशल मिडीयावरून केले.

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक फिट आणि स्टायलिश समजली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिलाही इडली मनापासून आवडते. याबद्दल तिने सोशल मिडियावर आपले मत व्यक्त करीत, इडली आपला अतिशय आवडता पदार्थ असून, आपल्या दिवसाची सुरुवात आपण हाच पदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊन करीत असल्याचे शिल्पा म्हणते. हा पदार्थ पचण्यास अतिशय हलका असून, हा जलद भूक शमविणारा असल्याचे शिल्पा सांगते. अश्या ह्या बहुगुणी पदार्थाचे आणखी बरेच फायदे आहेत.

इडलीच्या सेवनाने ब्लोटींग होत नाही. ज्यांना सतत शरीरावर सूज असल्याची किंवा काही खाल्ल्याने पोट फुगत राहण्याची तक्रार असेल, त्यांनी इडलीचे सेवन करावे. इडली हा पदार्थ पचण्यास अतिशय हलका आहे. त्यामुळे ह्याचे सेवन केल्याने पोटफुगी सारख्या समस्या कमी होतील. तसेच उडीद डाळ आणि तांदुळाच्या मिश्रणाने तयार करण्यात येणाऱ्या इडलीमध्ये सोडियमचे प्रमाण अगदी कमी असल्याने उच्च रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी याचे सेवन चांगले आहे. ह्याच्या सेवनाने कोलेस्टेरोल नियंत्रित राहण्यास मदत होते.

इडली हा पदार्थ वाफवून बनविला जात असल्याने ह्यामध्ये तेलाची मात्रा जवळ जवळ नसतेच. त्यामुळे वजन घटविण्यासाठी हा पदार्थ चांगला आहे. ह्या पदार्थाने शरीराला आवश्यक ती उर्जा मिळते आणि वाफविली असल्यामुळे पचण्यासाठी देखील इडली अगदी हलकी असते. एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये ६५ कॅलरीज असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment