किशोरावस्थेमध्ये पदार्पण करताना मुलांना द्या ही शिकवण


किशोरावस्थेत पदार्पण करताना मुलांमध्ये शारीरिक बदलांच्या सोबतच अनेक मानसिक बदलही घडत असतात. मुले ह्या वयामध्ये अधिक परिपक्व बनत जातात व त्यांच्या आसपास घडत असणाऱ्या गोष्टींचा नव्याने विचार करायला शिकत असतात. ह्या वयामध्ये मुलांना हळूहळू त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे असते. त्यामुळे अचानक जबाबदारी घेण्याची वेळ आली तरी मुलांचा गोंधळ उडत नाही. घरातील, किंवा घराबाहेरील लहान मोठ्या कामांची जबाबदारी मुलांकडे सोपवायला हवी. त्यामुळे घर सांभाळण्यात किंवा किंवा बाहेरच्या कामांमध्ये मुले ही आपला वाटा उचलू शकतील. भविष्यकाळामध्ये पेलाव्या लागणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी ही एक प्रकारची पूर्वतयारी म्हणता येऊ शकेल. पुढे शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर इतर शहरामध्ये किंवा परदेशामध्ये राहण्याची वेळ आली, तर या सवयी नक्कीच उपयोगी पडू शकतील.

आजकालच्या काळामध्ये मुलांना थोडाफार स्वयंपाक शिकविण्याची गरज आहे. कामानिमीत्त आईवडील दोघेही बाहेर असल्यास दर वेळी बाहेर जाऊन काहीतरी खाणे हा पर्याय शक्य होतोच असे नाही. अश्या वेळी मुलांना, त्यांना सहज बनविता येतील असे पदार्थ शिकविणे आवश्यक असते. मिल्क शेक्स, सँडविच, डोसा इत्यादी पदार्थ मुलांना सहज बनविता येण्यासारखे आहेत. त्याचबरोबर पदार्थ बनविल्यानंतर त्यासाठी लागलेले सर्व साहित्य नीट आवरून ठेऊन किचन स्वच्छ करण्याची सवयही मुलांना लावायला हवी.

आपल्या महत्वाच्या वस्तू सांभाळून ठेवण्याची सवय मुलांना लावायला हवी. मुले मोठी होईपर्यंत त्यांच्या वस्तू सांभाळून ठेवण्याची, कपाटे आवरण्याची कामे आई करीत असते. पण मुले कळती झाल्यावर त्यांच्या वस्तू त्यांनीच सांभाळून ठेवण्याबद्दल आग्रही असावे. तसेच कपड्यांची, पुस्तकांची कपाटे आवरून त्यांना नको असलेल्या वस्तू बाजूला काढण्याबद्दल देखील सांगावे. मुलांना पॉकेट मनी दिला जात असल्यास ते पैसे व्यवस्थितपणे खर्च करण्यासाठी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करावे. मुले मोबाईल फोन वापरत असल्यास, त्याची बिले भरणे, त्यांच्या गरजेच्या असलेल्या लहान सहन वस्तूंची खरेदी त्यांनी स्वतः करणे ह्या सवयी मुलांना लावायला हव्यात. त्याचबरोबर त्यांना दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनीचा हिशोब ठेवण्याबद्दल आग्रही असावे.

Leave a Comment