सव्वीस ते तीस लाख रुपये किलो किंमतीचा किडा..!


आजकाल सुपर मार्केट्स मध्ये अनेक चित्र विचित्र फळे, भाज्या, किंवा बाहेरून आयात केलेले खाद्यपदार्थ, वनौषधी पाहायला मिळत असतात. ‘एक्झॉटिक’, म्हणजेच अतिशय खास, दुर्मिळ जातींचे हे खाद्यपदार्थ किंवा वनौषधी, सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या पदार्थांच्या मानाने भरपूर किंमत मोजून विकत घेता येतात. उदाहरणार्थ काही खास जातीची मशरुम्स साधारणपणे पाचशे ते सहाशे रुपये किलो या भावाने उपलब्ध असतात. पण असा एक पदार्थ आहे, जो भारतामध्ये सापडतो, आणि ज्याला जगभरामध्ये खूपच मागणी आहे. हा पदार्थ सहजासहजी कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळणारा नाही. तसच याच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची घासाघीस होणे शक्य नाही. हा पदार्थ म्हणजे, जगभरातून भरपूर मागणी असलेला एक किडा आहे.

भारतामध्ये सापडणाऱ्या ह्या किड्यासाठी जगभरातील लोक लाखो रुपये मोजण्यासाठी तयार आहेत. ह्या जातीच्या एक किलो वजन भरेल इतक्या किड्यांची किंमत तब्बल सव्वीस ते तीस लाख रुपये इतकी आहे. हिमालय पर्वराजीच्या परीसरामध्ये सापडणारा हा ‘यासार्गुम्बा’ नामक दुर्मिळ किडा भुरकट रंगाचा असून, सुमारे दोन इंच लांबीचा असतो. ह्या किड्याच्या शरीराचा अर्धा भाग एखाद्या लहानशा रोपट्याप्रमाणे दिसतो. हा किडा शोधण्यासाठी अनेक जण दिवसचे दिवस जंगलांमध्ये भटकत असतात. ह्या किड्यापासून एक प्रकारचे दुर्मिळ औषध मिळत असल्याने ह्या किड्यांना जगभरामध्ये भरपूर मागणी आहे.

ह्या किड्यापासून तयार केली जाणारी औषधी मानवी शरीराचे बल वाढविण्यासाठी अतिशय गुणकारी आहे, म्हणजेच ही औषधी ‘व्हायाग्रा’ प्रमाणे उपयोगात आणली जाते. हा किडा अतिशय दुर्मिळ आणि मुश्कीलीनेच मिळणारा असल्याने ह्या किड्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. केवळ सहा महिने आयुष्य असलेला हा किडा मेल्यानंतर त्याला वाळवून त्याची पावडर बनविली जाते. ही पावडर औषध म्हणून वापरली जाते. ह्याच पावडरला ‘ हिमालयन व्हायाग्रा’ या नावाने देखील ओळखले जाते.

Leave a Comment