फेसबुकला खूप उशिर झालाय – अॅपल सीईओ टीम कुक


वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्यामुळे जगभरात टीका होत असलेल्या फेसबुकवर अॅपल कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यानेही ताशेरे ओढले आहेत. फेसबुकने खूप पूर्वीच स्वतःला नियंत्रित करण्याची गरज होती, आता कंपनीला खूप उशिर झाला आहे, असे कुक याने म्हटले आहे.

रिकोड आणि एमएसएनबीसी या संकेतस्थळांना दिलेल्या मुलाखतीत कुक याने हे मत व्यक्त केले आहे. ही मुलाखत येत्या 6 एप्रिल रोजी प्रक्षेपित होणार आहे.

फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग आणि इतरांनी ग्राहकांच्या डाटातून महसूल कमावला, याचाही कुक यांनी निषेध केला. ग्राहकांनाच उत्पादन समजून त्यांचा डाटा विकून आम्हीही अब्जावधी रूपये कमवू शकतो, मात्र असे न करण्याची आम्ही निवड केली आहे, असे ते म्हणाले.

“आत्म-नियमन हे सर्वोत्तम नियमन आहे, असे मला वाटते. मात्र आपण त्याच्या कितीतरी पुढे आलो आहोत, असे मला वाटते,” असे कुक यांनी सांगितले.

झुकेरबर्ग याच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते, असे विचारले असता ते म्हणाले, की मी अशा परिस्थितीत सापडलो नसतो. कुक यांनी यापूर्वीही डाटा सुरक्षेबाबत अधिक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली होती.

Leave a Comment