गुगलची ‘डुडल’च्या माध्यमातून भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींना आदरांजली


मुंबई – गुगलने भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली असून गुगलने डुडलद्वारे पारंपरिक वेशात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे पदवी प्रमाणपत्र दाखवतानाचे त्यांचे रेखाचित्र साकारुन त्यांना अभिवादन केले. हे चित्र बंगळूरूस्थित रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी साकारले आहे.

१८८६ मध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन अमेरिकेहून आनंदीबाई भारतात परतल्या. त्यांनी त्यानंतर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिलांच्या वॉर्डसाठी फिजिशिअन म्हणून कार्यभार स्वीकारला. भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हे तर सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या १९व्या वर्षात वैद्यकीय पदवी घेतलेली त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.

३१ मार्च १८६५ ला पुण्यातील एका सधन कुटुंबात जोशी यांचा जन्म झाला होता. त्यानंतर वयाच्या ९व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आनंदीबाईंना वयाच्या १४ वर्षी मुलगा झाला होता, पण त्याचा वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मृत्यू झाला आणि हाच प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांच्यातील शिक्षणाची आवड पाहून त्यांच्या पतीने त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालायतून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या.

पण आनंदीबाईंना दुर्दैवाने खूपच कमी आयुष्य लाभले. वयाचे २२वे वर्ष पूर्ण होण्याआधीच क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. असे असले तरी त्यांच्या कार्याने पुढील अनेक पिढ्यांमधील महिलांना प्रोत्साहन दिले. दरम्यान, शुक्र ग्रहावरील एका विवराला आनंदीबाईंचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Comment