फळांचे सेवन दिवसभरामध्ये कुठल्या वेळी करावे?


आपल्या आहारामध्ये डाळी, कडधान्ये, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्या सोबत ताज्या भाज्या आणि फळे यांचा समावेश असणे अतिशय आवश्यक आहे. ह्याच्या समावेशामुळे आपला आहार खऱ्या अर्थाने संतुलित बनतो. पण काय खाल्ले जावे हे जितके महत्वाचे आहे, तितकेच ते दिवसभरामध्ये कुठल्या वेळी खाल्ले जावे याचा विचार करणे देखील महत्वाचे ठरेल. फळांचा विचार करता, ह्यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक सर्व प्रकारची पौष्टिक तत्वे , म्हणजेच जीवनसत्वे, क्षार, अँटी ऑक्सिडंट्स मिळत असतात. त्यामुळे फळांचे सेवन जर ठराविक वेळी केले गेले तर त्याचा शरीराला अधिक लाभ होऊ शकतो.

आहारतज्ञांच्या मते फळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाणे चांगले. फळ खाल्ल्यानंतर त्यावर एक ग्लास पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सक्रीय होते, व पोट साफ होण्यास ही मदत होते. फळांच्या सेवनाने, दिवसभराच्या धावपळीसाठी आवश्यक असणारी उर्जा शरीराला मिळते. दिवसाची सुरुवात फळे खाऊन केल्याने शरीराला मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मिळत असतात.

दुपारच्या जेवणामध्ये देखील फळे घेणे श्रेयस्कर असल्याचे मत आहारतज्ञ व्यक्त करतात. फळांमध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये असल्याने पोट लवकर भरते. त्यामुळे ज्यांना वजन घटवायचे आहे, त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये बाकी पदार्थांच्या ऐवजी फळांचा जास्त समावेश करावा. मात्र ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनी दुपारी जेवणासोबत फळे खाण्याचे टाळावे. सामान्य भोजन घेणाऱ्यांनी जेवणाच्या दोन तासांच्या नंतर फळांचे सेवन करावे. आंबा आणि केळे ह्या फळांचे सेवन व्यायामानंतर करणे चांगले. ह्या फळांच्या सेवनाने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते, व्यायामामुळे घामावाटे शरीरातून बाहेर पडलेले इलेक्ट्रोलाईट ह्या फळांच्या सेवनाने मिळतात.

फळाचे सेवन दिवसभरामध्ये कधीही करावे, मात्र भोजनाच्या सोबत फळांचे सेवन टाळावे. सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन उत्तम, तर दुपारच्या भोजनाच्या किमान दोन तास आधी किंवा नंतर फळांचे सेवन उत्तम मानले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment