आयरिश बारमध्ये आता पाळीव कुत्र्यांसाठी खास मेन्यू


तुम्ही घरामधून कुठेतरी बाहेर जायला निघाला आहात, आणि तुमचे पाळीव कुत्रे तुमच्याआकडे मोठ्या आशेने पाहत आहे. तुम्ही त्याला सुद्धा तुमच्या बरोबर न्यावी अशी त्याची इच्छा त्याच्या डोळ्यांतून स्पष्टपणे व्यक्त होते आहे. पण बाहेर जेवायला जायचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला बरोबर नेऊ शकत नाही. ज्यांच्याकडे घरामध्ये पाळीव प्राणी असतील, त्यांच्या बाबतीत हा प्रसंग अगदी नेहमी घडत असेल. आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याला एकटे सोडून जाताना तुम्हाला थोडी अपराधीपणाची भावना देखील होत असेल. हीच भावना लक्षात घेऊन आयर्लंड मधील बेलफास्ट येथील एक बार, तिथे येणाऱ्या पाहुणे मंडळींसोबतच त्यांच्या पाळीव कुत्र्यांचाही पाहुणचार करीत आहे. मालकाबरोबर येणाऱ्या प्रत्येक पाळीव कुत्र्याचे इथे मनापासून स्वागत होते. इतकेच नाही, तर कुत्र्यांसाठी खास मेन्यू देखील या बारमध्ये आहे.

ह्या आयरिश बारचे नाव ‘ द डर्टी ओनियन ‘ असून, कुत्र्यांसाठी खास मेन्यू ठेवणारे हे बेलफास्ट मधील पहिले वहिले आगळे पब आहे. प्राणी प्रेमींना ह्या बारची कल्पना पसंत पडत असून, दिवसेंदिवस ह्या पबची लोकप्रियता वाढत आहे. खास कुत्र्यांसाठी असलेल्या मेन्यूमधील पदार्थ अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि उत्तम दर्जाचे असून, खास प्राण्यांसाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या ‘ नॅचरो ‘ या स्थानिक ब्रँडतर्फे या अन्नपदार्थांचा पुरवठा केला जातो. ह्या मेन्यू मध्ये कुत्र्यांना आवडतील अश्या अन्नपदार्थांचे काही पर्याय उपलब्ध आहेत. हे अन्नपदार्थ कुत्र्यांचे वयोगट आणि निरनिराळ्या प्रजाती लक्षात घेऊन निवडण्यात आले आहेत. इथे भाज्या आणि भात इथपासून बटाटे, मटन, ह्यांच्यापासून तयार केल्या गेलेल्या अनेक पदार्थांचे पर्याय पाळीव कुत्र्यांसाठी उपलब्ध असून, या पदार्थांचे दरही अतिशय माफक आहेत.

ह्या खाद्यपदार्थांच्या सोबतीने कुत्र्यांना आवडतील असे गोड पदार्थ देखील या मेन्यूमध्ये समाविष्ट आहेत. हे गोड पदार्थ कुत्र्यांच्या दातांना अपायकारक ठरणार नाहीत अश्या पद्धतीचे साहित्य वापरून बनविण्यात आले आहेत. ह्या पदार्थांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने आणि फायबर मुबलक मात्रेमध्ये असेल याची काळजी घेण्यात येत असल्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास हे पदार्थ फायदेशीर ठरत आहेत. तसेच या पदार्थांमध्ये निरनिराळ्या फ्लेवर्सचा पर्यायही उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या बारमध्ये खास कुत्र्यांसाठी तयार करणारी बियर देखील आहे. पण ही बियर अल्कोहोलविरहित असून, चिकन फ्लेवरमध्ये ही बियर उपलब्ध आहे.

Leave a Comment