ताजमहाल पाहा पण केवळ तीन तासांत


तुम्हाला जर जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायचा असेल, तर वेळेची व्यवस्थित आखणी करा. कारण यापुढे पर्यटकांना ही वास्तू केवळ तीन तासांपुरती खुली राहणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) जारी केलेल्या सूचनेनुसार, येत्या रविवारपासून ताजमहालात प्रवेश केवळ तीन तासांपर्यंत मर्यादित केला जाणार आहे.

या वास्तूवर अवकळा येण्यास सुरूवात झाली असून ताज महालवर पडणारा “मानवी भार” कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एएसआयने म्हटले आहे.

या संबंधात अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार केली जात आहे कारण तिकीट तपासण्यासाठी आणि नवीन वेळापत्रक लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज पडणार आहे, असे एएसआयच्या सूत्रांनी सांगितले.

या स्मारकाला भेट देणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन सीआयएसएफसाठी मोठे आव्हान बनले असून सुट्ट्या आणि विकेंडच्या दिवशी भेट देणाऱ्यांची संख्या 50,000 पेक्षा अधिक आहे. यात 15 वर्षांखालील बालकांचा समावेश नाही कारण त्यांना तिकिट लागत नाही.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राने अलीकडेच तालमहालच्या ढाच्याचा अभ्यास करून त्यावरील भार कमी करण्याची सूचना केली होती. विशेषत: ताजमहालमधील मुख्य कबरीतील पर्यटकांची गर्दी नियंत्रित करण्याची शिफारस केली होती. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला होता.

Leave a Comment