घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव झाल्यास करा हे उपाय


सध्या हवामान बदलत आहे. अश्या वेळी डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे डासांना पळविणारी क्रीम्स, कपड्यांवर चिकटविण्याचे पॅच यांच्याशिवाय घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. तर घरामध्ये डास पळविणारे निरनिराळे स्प्रे, अगरबत्ती यांचा वापर सुरु होताना दिसत आहे. ह्या उत्पादनांमधून निघणाऱ्या धुरामुळे किंवा वासामुळे अनेकदा श्वसनास त्रास होऊ शकतो. शिवाय ह्या उत्पादनांमध्ये निरनिराळी रसायने वापरली जात असल्याने, ह्याचा प्रमाणाबाहेर केला गेलेला उपयोग कालांतराने शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव झाल्यास काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करून डासांचा नायनाट करता येऊ शकतो.

आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी कडूनिंब अतिशय गुणकारी आहेच, पण ह्याचा फायदा डासांना पळविण्याकरिता देखील होतो. ह्यासाठी कडूनिम्बाचे व नारळाचे तेल समप्रमाणात एकत्र करावे. हे तेल अंगाला चोळल्याने डास चावत नाहीत. विशेषतः लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून हे तेल वापरता येईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची रसायने नसल्यामुळे ह्या तेलापासून काही अपाय होण्याची शक्यता नाही. ह्या तेलाचा परिणाम आठ तासांपर्यंत राहतो.

घरामध्ये डास शिरले असल्यास रासायनिक स्प्रे किंवा कॉईलचा वापर करण्यापेक्षा कापूर जाळून त्याचा धूर सर्व घरामध्ये पसरवावा. ह्या धुरामुळे घरामध्ये सुगंध पसरेल आणि डास ही नाहीसे होतील. तसेच लिंबाच्या सालीचे तेल आणि निलगिरीचे तेल एकत्र करून अंगाला लावल्याने देखील डास चावत नाहीत. घरामध्ये खिडकीजवळ तुळशीचे रोप ठेवल्याने डास खिडकीवाटे घरामध्ये शिरू शकणार नाहीत. तुळस नसेल, तर लिंबाचे किंवा झेंडूच्या फुलांचे रोप देखील खिडकीमध्ये ठेवता येईल.

डास लसणाच्या वासाने देखील पळतात. ह्यासाठी थोड्या लसणाच्या पाकळ्या कुटून घेऊन त्या पाण्यामध्ये उकळाव्यात, व हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये घालून हा स्प्रे घरभर करावा. ह्या स्प्रेमुळे घरातील डास नाहीसे होतील. लॅव्हेंडरचा वास ही अतिशय उग्र असतो. ह्या वासाने देखील डास नाहीसे होतात. त्यामुळे घरामध्ये संध्याकाळच्या वेळी लॅव्हेंडरचा वास असणारा एअर फ्रेशनर फवारावा. घरामध्ये तसेच दारांच्या व खिडक्यांच्या जाळ्यांवर ही रूम फ्रेशनरचा फवारा करावा. ह्यामुळे घरामध्ये डासांचा शिरकाव होणार नाही, व घरामध्ये सुगंधही दरवळत राहील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment