आहारामध्ये काळ्या मिठाचे फायदे


उलट्या किंवा अपचन झाल्यानंतर काळ्या मिठाचे सेवन हा रामबाण उपाय सर्वमान्य आहे. जर मळमळ होऊन उलटीची भावना होत असेल, तर जिभेखाली चिमुटभर काळे मीठ धरल्याने उलटीची भावना कमी होऊ लागते. लिंबाच्या सरबतामध्ये काळ्या मिठाचा वापर केल्याने शरीरामध्ये चैतन्य येते. काळे मीठ सलादवर किंवा फळांच्या फोडींवर देखील घालून खाल्ले जाऊ शकते. पण केवळ चव वाढविणे, ह्या व्यतरिक्त काळे मीठ आपल्या आरोग्यासाठी आणखी किती तरी प्रकारे गुणकारी आहे. काळ्या मिठामध्ये असणारे क्षार आणि इतर पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर आहेत.

त्वचेची निगा राखण्यासाठी काळे मीठ वापरता येते. बाजारामधून आणल्या जाणाऱ्या साबण आणि फेस वॉश किंवा बॉडी वॉश मध्ये आपल्या त्वचेसाठी हानिकारक असणाऱ्या अनेक रसायनांचा समावेश असतो. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी शक्यतो नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे जास्त श्रेयस्कर ठरते. काळ्या मिठाचा वापर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. तसेच हातापायांवर सूज येत असल्यास गरम पाण्यामध्ये थोडे काळे मीठ घालून त्यामध्ये हात किंवा पाय काही वेळ बुडवून ठेवावे. त्यामुळे सूज उतरण्यास मदत मिळेल.

केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ सहायक आहे. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील, किंवा केसांमध्ये स्प्लिट एन्ड्स झाले असतील, तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील. ह्यासाठी एक चिमुटभर काळे मीठ टोमॅटोच्या रसामध्ये घालून हे दररोज प्यायल्याने केसांसंबंधी तक्रारी दूर होण्यास मदत मिळेल. काळ्या मिठाने बद्ध्कोष्ठाची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम पडतो. पोटामध्ये तयार होत असलेल्या अॅसिड्सची तीव्रता कमी करण्याची क्षमता काळ्या मिठामध्ये आहे. तसेच यामध्ये असलेल्या क्षारांमुळे, शरीरामध्ये, उलट्या झाल्यामुळे आलेला अशक्तपणा भरून निघण्यास मदत होते.

कधी तरी अपचन झाल्याने पोटामध्ये कळा येऊ लागतात. पोटाचे स्नायू आखडल्याप्रमाणे होऊन किंवा पिळल्याप्रमाणे पोटदुखी होऊ लागते. अश्यावेळी लिंबाच्या सरबतामध्ये काळे मीठ घालून त्याचे सेवन करावे. काळ्या मिठामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्याने स्नायू आखडले असल्यास ह्याच्या सेवनाने आराम पडतो. तसेच घसा खवखवत असल्यास गरम पाण्यामध्ये काळे मीठ घालून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. सामान्य रिफाइंड मिठामुळे शरीरामध्ये वॉटर रीटेन्शन वाढते, तर काळ्या मिठाच्या सेवनामुळे कमी होते. ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, त्यांच्यासाठी काळ्या मिठाचे सेवन चांगले आहे. ह्याच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment