… अन् अचानक गायब झाली ट्रेन..!


रुळांवरून सुसाट वेगाने धावणारी ट्रेन जर अचानक गायब झाली असे तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. विशेषतः ज्या व्यक्तींचा अश्या अकल्पनीय हकीकतींवर विश्वास नाही, ज्यांना अश्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक आधार मिळत नाही, त्यांना तर ही हकीकत मुळीच खरी वाटणार नाही. आता ह्या हकीकतीमध्ये वास्तविकता किती आहे हे कोणी नक्की सांगू शाणार नाही, पण ह्या अचानकपणे, कोणताही मागमूस न ठेवता गायब झालेल्या ट्रेनची हकीकत मोठी रोचक आहे यामध्ये शंका नाही.

प्रवासाला निघालेल्या आणि वाटेत अचानकच संपूर्णपणे गायब झालेल्या ह्या रोमन ट्रेन बद्दल तुम्हाला इंटरनेट वर देखील अनेक अजबगजब किस्से वाचायला मिळतील. असे म्हटले जाते, की १९११ साली ही ट्रेन अचानकपणे गायब झाली. त्यानंतर रोममध्ये गायब झालेली ही ट्रेन मेक्सिको मध्ये जाऊन कशी पोहोचली, हे रहस्य आजतागायत कोणालाही उकलले नाही. १९११ साली रोम मधील एका स्टेशन वरून निघालेल्या या ट्रेनमध्ये १०६ यात्रेकरू होते. ह्या ट्रेनला आपल्या प्रवासादरम्यान एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा पार करावा लागत असे. ह्या ट्रेनमध्ये बसून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, त्यांच्यापुढे कसले संकट वाढून ठेवले आहे, याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.

ट्रेन ठरलेल्या वेळी स्टेशन वरून निघाली. बोगद्याजवळ येईपर्यंत ट्रेनचा प्रवास नेहमीप्रमाणेच चालला होता. मात्र ट्रेन बोगद्याजवळ पोहोचताच अचानक वातावरण बदलले. एकदम भयाण शांतता पसरली. आसपास पांढरा शुभ्र धूर पसरू लागला. ट्रेनमधील दोन प्रवाश्यांना ही घटना मोठी विचित्र वाटली, आणि त्यांनी तत्काळ चालत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. ट्रेन तशीच वेगाने बोगद्यामध्ये शिरली, पण पलीकडून बोगद्याच्या बाहेर मात्र आली नाही. सुसाट वेगाने बोगद्यामध्ये शिरलेली ट्रेन चक्क गायब झाली ! या घटनेनंतर ही ट्रेन पुन्हा कोणाच्या दृष्टीस पडली नाही.

ट्रेनमधून ज्या लोकांनी उड्या मारून आपला जीव वाचविला होता, त्यांनी ही हकीकत इतरांना सांगितली. लोकांचा त्यावर अर्थातच विश्वास बसला नाही. पण तरीही ट्रेन नक्की गेली कुठे याचा शोध घेणे आवश्यक असल्यामुळे एक चौकशी समिती नेमली गेली. त्यांनी केलेल्या तपासणीत कसलेच निष्पन्न न झाल्याने नक्की काय घडले ह्या रहस्याची उकल होऊ शकली नाही. पण हे रहस्य इथेच संपले नाही. मेक्सिको मधील मनोवैज्ञानिकाने एक अतिशय विचित्र घटना कथन केली. त्याच्या म्हणण्यानुसार, ह्या घटनेची सत्यता सिद्ध करणार काही पुरावे त्यांच्याजवळ होते. त्यातील काही कागदपत्रांच्या नुसार, मेक्सिकोमधील टाऊन हॉस्पिटलमध्ये १०४ व्यक्ती एकाच वेळी भरती करण्यात आल्या होत्या. ह्या सर्व व्यक्तींना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे स्पष्टपणे लक्षात येत होते. ह्या व्यक्तींनी घटनेचे केलेले वर्णन अगदी एकसारखेच होते. विशेष म्हणजे ह्या सर्व व्यक्ती इटालियन होत्या.

ह्यामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी, की आपण रेल्वेनेच तिथे आलो असल्याचे सर्वांचे म्हणणे होते. तसेच सर्वजण रोमचे रहिवासी असल्याचे ठामपणे सांगत होते. पण रोमहून निघालेली ट्रेन मेक्सिकोमध्ये कशी पोहोचली हे रहस्य मात्र आजही कायम आहे.

Leave a Comment