विस्तारा एअरलाइन्सच्या हवाई सुंदरीची पुणेकर आजोबांनी काढली छेड


नवी दिल्ली- एका हवाई सुंदरीशी विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात छेडछाडीचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी महिला क्रू मेंबर्सने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एअर विस्तारा कंपनीचे विमान २४ मार्च रोजी लखनऊहून दिल्लीला जात असताना या हवाई सुंदरीला आरोपी प्रवाशाने वाईट हेतूने स्पर्श केला. पोलिसांनी या प्रकरणात हवाई सुंदरीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

या हवाई सुंदरीची छेड ६२ वर्षीय पुणेकर आजोबांनी काढली असून, हे आजोबा पेशाने व्यावसायिक आहेत. या आजोबांनी विमान जमिनीवर उतरल्यानंतर हवाई सुंदरीची छेड काढली, ६२ वर्षीय आजोबांना या आरोपाखाली अटक करण्यात आली. विस्तारा एअरलाइन्सने या प्रकारानंतर एक बैठकही घेतली असून, नो फ्लाय लिस्टमध्ये या पुणेकर आजोबांना टाकण्यात आले आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचा-यांशी चुकीचे वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांवर ३० दिवसांसाठी विमान प्रवासाची बंद घालण्यात येत असल्याची माहिती विस्तारा एअरलाइन्सनं दिली आहे.