हॉटेलमध्ये वास्तव्यास जाताना..


अनेकदा भ्रमंतीच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने परगावी किंवा परदेशी गेल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्याचा प्रसंग आपल्यावर येत असतो. काही तासांच्या प्रवासाने थकून गेल्यानंतर हॉटेलमधील आपल्या खोलीमध्ये निवांत आराम करण्याची कल्पना आपल्याला सुखद वाटत असते. पण तरीही हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हॉटेलमधील आपल्या खोलीमध्ये चेक-ईन केल्यानंतर पलंगावरील बेडशीट्स, टॉवेल, नॅपकिन इत्यादी वस्तू काळजीपूर्वक पाहून घेऊन, त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग वगैरे असल्यास, किंवा ते थोडेफार फाटले असल्यास ही गोष्ट त्वरित हाऊसकीपिंग स्टाफच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे. तसेच शक्य झाल्यास आपल्या मोबाईल फोन वर छायाचित्रे टिपून ठेवावीत. अनेकदा चेक-आउट करताना आधीच पडलेल्या दागांसाठी किंवा आधीपासून फाटलेल्या टॉवेल, नॅपकिन्स साठी दंड करण्यात आल्याच्या अनेक घटना घडून गेल्या आहेत. त्यामुळे हे काळजी वेळीच घेणे अगत्याचे आहे. तसेच आपल्या खोलीमध्ये असलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये बिघाड असल्यास त्याबद्दल देखील स्टाफला त्वरित माहिती द्यावी.

आपल्यासोबत अँटी बॅक्टेरियल वेट वाइप्स असणे आवश्यक आहे. ह्या वाइप्सच्या मदतीने तुम्ही खोलीतील सर्वात जास्त हाताळल्या जाणाऱ्या वस्तू, म्हणजेच दारांची हँडल्स, लाईट स्विचेस, बाथरूममधील नळ इत्यादी निर्जंतुक करून घेऊ शकता. तसेच पाणी पिण्यासाठी डीस्पोजेबल कप किंवा ग्लासेसचा वापर करा. खोली जर एअर कंडीशन्ड असेल, तर त्यातील हवा काहीशी दमट, कुबट असते. त्यामुळे थोडा वेळ खोलीच्या खिडक्या उघडून खोलामध्ये ताजी हवा खेळू देणे श्रेयस्कर.

आजकाल बहुतेक हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये पर्सनल सेफ ( तिजोरी ) असतात. आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी यांचा वापर करावा. आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे इत्यादी गोष्टी खोलीमध्ये इतस्ततः ठेवणे आवर्जून टाळायला हवे. तसेच चेक-ईन किंवा चेक-आउट करताना देखील हॉटेलच्या लॉबीमध्ये आपले सामान व्यवस्थित आणि सुरक्षित असेल याची काळजी घ्यावी.

खोलीमधील लहानशा फ्रीजमध्ये किवा मिनी बार मध्ये ठेवलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेये यांच्यासाठी वेगळा दर आकारला जात असतो, हे माहित असणे गरजेचे असते. तसेच आपले कपडे धुवायला किंवा इस्त्रीसाठी देताना देखील बहुतेक होटेल्स मध्ये यासाठी वेगळा दर आकारला जात असतो. त्याची चौकशी वेळेवर करून घेणे अगत्याचे आहे. सोबत लहान मुले असतील तर त्यांच्यामुळे, किंवा आपल्यामुळे ही, इतर खोल्यांमधील पाहुण्यांना त्रास किंवा कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.

Leave a Comment