हा देव भावाचा भुकेला


भारतात मंदिर, देवळे, दर्गे अश्या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी, देवासाठी सोने, हिरे, चांदी, रोकड असे दिले जाणारे चढावे आपल्याला नवीन नाहीत. मात्र देव खरेच हे सारे मागतो काय असा प्रश्न कोणालाच पडत नाही. पूर्वीपासून संतसज्जन देव भावाचा भुकेला आहे असे सांगून गेले आहेत. असा भावाचा भुकेला एक देव कर्नाटकात बंगलोर म्हैसूर रस्त्यावर असून कोटीकाकालिना काडू बसप्पा असे म्हटले जाते. हा बसप्पा म्हणजे महादेव आहेत.


या देवाला दगड अर्पण करण्याची प्रथा असून गेली शेकडो वर्षे हीच प्रथा पाळली जाते. येथे मंदिर नाही तर छोट्याश्या देवळीत शंकराची मूर्ती आहे. या मंदिराला पुजारी नाही. भाविक स्वतः पूजा करतात आणि मनोकामना पूर्ण झाली कि तीन किंवा पाच दगड येथे अर्पण करतात. हे दगड कोणत्याही आकाराचे चालतात मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे हे दगड तुमच्या शेतातील किंवा जमिनीतील हवेत.या मंदिराबाहेर यामुळे दगडांची रास जमली आहे.

असे सांगतात कि आसपासच्या परिसरातील खेडूत, शेतकरी येथे मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. देवासमोर इच्छा बोलून दाखवितात आणि ती पूर्ण झाली कि सुगी संपल्यावर दगड आणून येथे वाहतात. या भाविकांचे नवस गाईगुरे जगावीत, शेतात पिक चांगले यावे असेच असतात असेही सांगितले जाते.

Leave a Comment