पहिल्या लॉटरी तिकिटाने रातोरात बनला कोट्याधीश


आयुष्यात प्रथमच लॉटरी तिकीट घ्यावे आणि त्याला करोडो रुपयांचे बक्षीस मिळावे असा योग बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या नशीबात येत असेल. केरळ मधील दानिश कोथ्रंबन असाच सुदैवी ठरला आहे. त्याने दुबईत घेतलेल्या पहिल्याच लॉटरी तिकिटाला १० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे. यामुळे कोट्याधीश होण्याचे कधी स्वप्नही न पाहिलेला दानिश एका रात्रीत कोट्याधीश बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दानिश गेली दीड वर्ष दुबईमध्ये इलेक्ट्रिशीअन म्हणून काम करतो आहे. काही दिवसापूर्वी मायभूमी केरळला सुट्टीवर येताना त्याने दुबई जॅकपॉटचे पहिले तिकीट घेतले होते. याच तिकिटाला बक्षीस लागले आणि तसा फोन त्याला आला तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे दानिशला अवघड झाले होते. दानिशबरोबरच या बक्षीसाचा मानकरी जॉर्डनचा यॉन हा युवकहि ठरला आहे.

याच वर्षात जानेवारीत एका भारतीयाला अशीच १२ दशलक्ष दिरहामची लॉटरी लागली होती. युएई मध्ये या प्रकारे आत्तापर्यंत १२४ भारतीयांनी अशी लॉटरी जिंकली आहे असे समजते.