समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या अमृत कलशाचे रहस्य झाले उघड


देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनाची कथा आपल्याला ठाऊक आहे. या समुद्रमंथनातून अनेक दिव्य वस्तू उत्पन्न झाल्या. त्यापैकी एक वस्तू उत्पन्न झाली ती म्हणजे अमृत. देवांना आणि दानवांना अमरत्व प्रदान करणारे असे हे अमृत देवांनाही हवे होते, आणि दानवांनाही. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून चतुराईने अमृत कलश देवांच्या आधीन केला ही कथा देखील आपण सर्वच ऐकत आलो आहोत. पण हा अमृत कलश खरोखरच अस्तित्वात असल्याचे काहीसे विस्मित करणारे शोध काही काळापूर्वी प्रसिद्ध झाले.

ह्या शोधांच्या अनुसार इंडोनेशिया या देशामध्ये असणाऱ्या एका मंदिरामध्ये अमृत कलश आजही अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. हाच अमृत कलश देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून उपन्न झाला असल्याची मान्यता आहे. ह्या अमृत कलशामध्ये एक शिवलिंग असल्याचे ही सांगितले जाते. इंडोनेशिया देशातील ‘कंदी सुकुह’ नामक मंदिरामध्ये हा कलश असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर अतिशय प्राचीन असून, गेल्या शेकडो वर्षांपासून हा अमृत कलश या मंदिरामध्ये असल्याचे म्हटले जाते. ह्या अमृत कलशामधील जल, किंवा अमृत सुकून न जाता, आज ही तसेच आहे असे म्हणतात.

ह्या मंदिरांच्या भिंतींवर आदिपर्वातील काही घटना अंकित आहेत. त्यावरून हे मंदिर किती प्राचीन असावे याचा अंदाज येतो. ही अंकित भित्तीचित्रे पाहता, ह्या मंदिरामध्ये असणारा कलश अमृत कलशच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१६ साल या मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम सुरु असताना मंदिराच्या एका भिंतीखाली दडविलेला हा कलश पुरातत्व संशोधकांच्या हाती लागला. हा कलश शुद्ध तांब्याचा बनलेला असून, यावर एक पारदर्शी शिवलिंग आहे. ह्या कलशामध्ये एक विशेष द्रव पदार्थ असल्याचे समजते.

हा कलश इतका खास पद्धतीने बनविला गेला आहे, की तो उघडणे अजून शक्य झालेले नाही. विशेष गोष्ट अशी की मंदिराच्या ज्या भिंतीखाली हा कलश सापडला, त्या भिंतीवर समुद्रमंथनाचा प्रसंग चितारलेला होता. त्यामुळे हे भित्तीचित्र आणि हा कलश यांच्यातील संबंधामध्ये खरोखरच काही तथ्य आहे, की हा केवळ योगायोग आहे, हे समजणे अवघड आहे. कार्बन डेटिंग केल्यानंतर बाराव्या दशकापासून हा कलश येथे दडविलेला असल्याचे निदान तज्ञांनी केले आहे.

Leave a Comment