प्रत्येक कॉल व मेसेजची नोंद ठेवते फेसबुक!


फेसबुक आणि केम्ब्रिज अॅनालिटिकाचा घोटाळा समोर आल्यानंतर एकानंतर एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली असून वापरकर्त्याच्या प्रत्येक कॉल व मेसेजची नोंद फेसबुक ठेवत असल्याचे वृत्त दि गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राने दिले आहे. मात्र ही प्रक्रिया वापरकर्त्यासाठी पर्यायी असते, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वापरकर्त्यांना आपले खाते डिलीट करणेही अवघड झाले असून ते फक्त खाते निष्क्रिय करू शकतात, असेही या बातमीत म्हटले आहे. तसेच एखाद्या वापरकर्त्याला खाते कायमचे बंद करण्यात यश आले,तरी त्याची खूप माहिती फेसबुकच्या सर्व्हरवरच राहते, असेही त्यात म्हटले आहे.

”तुम्हाला लोकांना शोधणे सोपे जावे हा अॅप व सेवेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा फोनवरून मेसेजिंग आणि सोशल अॅपवर साईन इन करता, तेव्हा फोनमधील संपर्क अपलोड करून त्याचे काम व्यापक पातळीवर सुरू होते,” असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटल्याचे गार्डियनने म्हटले आहे.

मात्र ही कॉन्टॅक्ट अपलोडिंग वैकल्पिक आहे. फोनवरील संपर्क अपलोड करण्यास तुम्ही परवानगी देता का, असे लोकांना स्पष्ट विचारले जाते, असेही या प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment