कनक भवनात आजही राम जानकीचे वास्तव्य


रामभूमी अयोध्येत मंदिरांची एकच गर्दी असली तरी कनक भवनाचे महत्व आगळेच आहे. भाविकांचे श्रद्धास्थान आणि साधू संतांचे माहेर असलेल्या या महालात आजही राम जानकी यांचे वास्तव्य असल्याचे अनुभव सांगितले जातात. रामाची सावत्र आई कैकयीमातेने हा महाल सीतेला सुनमुख दर्शन घेतल्यानंतर दिला होता असे सांगितले जाते. याच महालात नंतर राम सीता राहत होते. विशेष म्हणजे हा महाल रामाच्या खासगी निवासाचे स्थान असल्याने येथे आजही राम आणि सीता याच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या देवाची मूर्ती नाही. कोणत्याही पुरुषाला येथे प्रवेश नव्हता. रामाचा परम भक्त हनुमान याने विनंती केल्यावरून त्याला येथे राहता आले तेही महालाच्या अंगणात. त्यामुळे हनुमानाची प्रतिमा महालाच्या अंगणात आहे.


सध्या अस्तित्वात असलेला महाल ओरछा राजा सवाई महेंद्रप्रताप सिंग याची राणी वृषभानू कुवारी हिने बांधलेला आहे. असे सांगतात १८९१ साली हे बांधकाम केले गेले. त्यापूर्वी त्रेतायुगात राम सीतेने देहत्याग केल्यावर त्यांचा मुलगा कुश याने तेथे राम सीतेच्या मूर्ती स्थापन केल्या होत्या. त्रेता युगाचा अंत झाल्यावर हा महालही नष्ट झाला. त्यानंतर जरासंध वधाच्या वेळी श्रीकृष्ण येथे आले तेव्हा त्यांनी पुन्हा मंदिर उभारून मूर्ती स्थापन केल्या.

पहिल्या कनक महालाचे निर्माण विश्वकर्माच्या देखरेखीखाली दशरथाने कैकयीच्या सांगण्यावरून करून घेतले होते. गर्भग्रहात राम सीतेची मूर्ती आहे त्याशेजारी शयनगृह आहे. तसेच सीतेच्या अष्टदासीचे आठ कुंज येथे पाहायला मिळतात. येथे राम सीता रोज सारीपाट खेळतात अशी भावना असून रात्री मांडलेला सारीपाट सकाळी सोंगट्या हललेल्या स्थितीत दिसतो असेही सांगितले जाते.

Leave a Comment