फूड पॉयझनिंग झाल्यास…


अनेकदा घराबाहेर पडल्यानंतर आपल्या आवडत्या खाद्य पदार्थांचा स्टॉल समोर दिसतो, आणि त्यावरील चटपटीत खाद्यपदार्थ नजरेला पडल्यानंतर ते चाखण्याचा मोह न आवरल्याने आपण भेळ, पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थांवर ताव मारतो. किंवा कित्येकदा नातेवाईक मंडळींच्या सोबत बाहेर गेल्यावर, मित्रमंडळींच्या समवेत पार्टीचा आनंद घेण्याच्या नादामध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना फारसा विचार केला जात नाही. अश्या वेळी अनेकदा घरी परत आल्यानंतर उलट्यांचा, पोटदुखीचा त्रास सुरु होतो. अगदी प्यायलेले पाणी देखील उलटून पडू लागते. अनेकदा, रस्त्यावरील स्टॉल्स वरील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अश्या प्रकारे फूड पॉयझनिंग होते. याद्वारे होणारा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात. मात्र जर उलट्या किंवा जुलाबांचे प्रमाण जास्त असेल, त्यावर नियंत्र मिळविणे शक्य होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जाणे अत्यावश्यक आहे.

लसूण ही अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल आहे. त्यामुळे पोटदुखी किंवा डायरिया यांच्या सारख्या तक्रारींवर लसूण गुणकारी आहे. जर फूड पॉयझनिंग मुळे पोटदुखी आणि जुलाब होऊ लागले, तर एक लसणीची पाकळी तोंडात ठेऊन चघळत राहावी, व त्यावर कोमट पाणी प्यावे. किंवा गरम पाण्यामध्ये काही लसणीच्या पाकळ्या उकळून घेऊन हे पाणी थोड्या थोड्या वेळाने पीत राहावे. त्यामुळे पोटदुखी आणि जुलाब कमी होतील. तसेच लिंबाच्या रसाच्या सेवनाने पोटामधील अपायकारक जीवाणूंचा नाश होतो. लिंबाचा रस अॅसिडीक असल्याने ह्याच्या मुळे जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता, कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून हे पाणी दिवसभर थोडे थोडे पीत रहावे.

लिंबाच्या रसाप्रमाणेच अॅपल सायडर व्हिनेगर देखील गुणकारी आहे. ह्याने देखील पोटातील इन्फेक्शन दूर होण्यास मदत मिळते. तसेच ह्याच्या सेवानाने आतड्यांच्या लायनिंगला सूज आल्यास त्यातही आराम पडतो. त्यामुळे पोटदुखी कमी होते. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घालून त्याचे सेवन करावे. हे व्हिनेगर जेवणापूर्वी प्यावे. तसेच तुळशीची पाने देखील फूड पॉयझनिंग मुळे होणाऱ्या उलट्या जुलाब यांवर गुणकारी आहेत. दोन तीन कप पाण्यामध्ये थोडी तुळशीची पाने घालून हे पाणी चांगले उकळावे. मग हे पाणी थंड करून घ्यावे. दिवसभरामध्ये अनेक वेळा हे पाणी थोडे थोडे प्यावे. हे पाणी पिताना त्यामध्ये थोडा मध घालावा. साध्या दह्यामध्ये तुळशीची पाने मिसळून हे दही खाल्ल्याने देखील आराम पडतो.

फूड पॉयझनिंग झालेले असताना तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर काही तास दुध, चहा किंवा कॉफी या पदार्थांचे सेवन करू नये. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे, त्यामुळे शरीरामध्ये डीहायड्रेशन होण्याचा धोका उद्भविणार नाही. जर अन्न सेवन केल्यामुळे उलट्या होत असतील किंवा सतत मळमळत असेल, तर डाळींचे सूप, भाताची पेज याप्रमाणे हलका द्रव आहार घ्यावा. त्याचप्रमाणे विश्रांती घेणे ही गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment