लहान मुलांमध्ये क्षयाची लक्षणे कशी ओळखावीत?


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे २०१६ साली प्रसिद्ध केल्या गेलेल्या अहवालानुसार जगभरामध्ये दर वर्षी पंधरा वर्षांखालील सुमारे दहा लाख मुले क्षयरोगाने ग्रस्त होतात. त्यातील सुमारे दोन लाख मुले या रोगापायी आपले प्राण गमावतात. तसेच क्षयग्रस्त मुलांना एचआयव्ही संक्रमण होण्याचाही धोका जास्त असतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलांमध्ये क्षय आढळणे याचे मुख्य कारण म्हणजे या रोगाचे वेळेवर योग्य निदान न होणे हे आहे. साधारणपणे क्षयाच्या वयस्क रुग्णांमध्ये जी लक्षणे आढळतात, त्यापेक्षा काहीशी वेगळी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात.

मुलांच्या शरीराची वाढ निसर्गनियमाप्रमाणे होत असते. पण ज्या मुलांना क्षय असेल, त्या मुलांची शरीरे अशक्त दिसू लागतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची वाढही खुंटल्याप्रमाणे होते. भूक लागणे कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊ लागतो. उत्तम आहार आणि व्यवस्थित संगोपन केले जात असूनही जर मुलांच्या शरीराची वाढ व्यवस्थित होत नसेल, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच क्षयग्रस्त मुलांच्या गळ्याच्या जवळील शिरा सुजल्याप्रमाणे दिसू लागणे हे देखील क्षयाचे लक्षण असू शकते. ह्या शिरा सुजून मुलांचा घसा सतत दुखू लागतो. अश्या वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

अकारण अचानक थंडी वाजत असेल, किंवा अचानक रात्रीच्या वेळी ताप भरत असेल आणि खूप घामही येत असेल, तर हे देखील क्षयाचे लक्षण असू शकते. ताप अनेकदा अनेक निरनिराळ्या कारणांमुळे येऊ शकतो. पण वारंवार थंडी वाजून ताप येत असल्यास तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच अनेकदा छातीमध्ये दुखू लागणे, कळा येणे घडू शकते. मुलांना कोणतीही दुखापत न होता, किंवा इतर कोणताही आजार नसताना छातीमध्ये वेदना होऊ लागल्या, तर हे क्षयाचे लक्षण असू शकते. त्यामुळे अश्या वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच झालेला खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळाकरिता राहिल्यास, किंवा अचानक वजन घटू लागल्यासही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment