गुगलचा ‘चिपको’ आंदोलनातील नायिकांना सलाम


नवी दिल्ली – जगप्रसिद्ध जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून सत्तरच्या दशकात पर्यावरण संरक्षणासाठी एल्गार पुकारणाऱ्या ‘चिपको’ आंदोलनातील नायिकांना सलाम केला असून चिपको आंदोलनाच्या ४५ व्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने गुगलने खास डुडल साकारले आहे.

१७३० मध्ये राजस्थानमधील बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाची मूळ प्रेरणा वृक्षबचावासाठी केलेल्या लढ्यात होती. ‘चिपको’ आंदोलनाची मुहूर्तमेढ आधुनिक भारतात चंडीप्रसाद भट्ट आणि त्यांच्यानंतर सुंदरलाल बहुगुणा यांनी रोवली होती. सामान्य महिला या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. ठेकेदार झाडे कापायला माणसे घेऊन आला की, कार्यकर्ते, स्त्रिया, मुले झाडांना मिठ्या मारून बसत आणि ‘पेड कटने नही देंगे’च्या घोषणा देत. त्यातून ‘चिपको’ या नावाने आंदोलन जगभरात नावारूपाला आले.

आपल्या संकेतस्थळावर डुडल निर्मितीची कारणे गुगलने स्पष्ट केली असून चिपको आंदोलन ‘इकोफेमिनिस्ट’ चळवळ होती. आंदोलनाची सुत्रे महिलांनी हाती घेतली. जंगलतोडीमुळे इंधन आणि पाण्याच्या होणाऱ्या तुटवड्याचा त्यांना फटका बसला होता. त्यातून त्यांनी लढा उभारल्याचे गुगलने म्हटले आहे. स्वभू कोहली आणि विप्लव सिंग यांनी आजचे डुडल बनविले आहे.

Leave a Comment