१० कोटी युजर्स फेसबुकला रामराम ठोकण्याच्या तयारीत


कॅलिफोर्निया – फेसबुक वापरणाऱ्या लोकांचा पाच कोटी युजर्सचा डाटा लीक झाल्याची बातमी पसरल्यानंतर अपेक्षाभंग झाला असून फेसबुकला १० कोटी युजर्स रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. यातील बहुतेक जणांनी तर आपले अकाउंट बंद केले किंवा फेसबुक अॅप डिलीट केले. अनेकांनी फेसबुक बंद करण्याची इच्छा स्टेटस अपडेट किंवा मेसेजच्या माध्यमातून व्यक्त केली.

जवळपास २१० कोटी युजर्स फेसबुकचे जगभरात आहेत. तंत्रज्ञानातील क्षेत्रातील वेबसाइट “द वर्ज’ नुसार आता या सोशल नेटवर्किंग साइटवर विश्वास व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची संख्या २०० कोटींपर्यंत जाऊ शकते. याचाच अर्थ जवळपास १० कोटी युजर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय मागील पाच दिवसांत फेसबुकचे शेअर १० टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे कंपनीला जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

दरम्यान समोर येणारी आकडेवारी चुकीची असून या आकडेवारीत काहीच तथ्य नसल्याचे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले. केंब्रिज अॅनालिटिका वाद समोर आल्यानंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये १४ टक्के घसरण पाहायला मिळाली. फेसबुकला मिळणाऱ्या जाहिरातींवरही परिणाम झाला आहे. फेसबुकला जर्मन कंपनी कॉमर्जबँक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती करणाऱ्या सोनोसने दिल्या जाणाऱ्या जाहिराती थांबवल्या आहेत. डाटा अँड नेटवर्क अॅनालिसिस करणाऱ्या नेटवर्क इंटेलिजन्स कंपनीचे बिझनेस हेड अल्ताफ हाल्दे म्हणाले की, युजर्सनी कुठलेही अॅप वापरण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता पडताळून पाहिली पाहिजे. असे केले तरच डाटा चोरीपासून आपणाला वाचता येईल.

Leave a Comment