रायगडावरील उत्खननात सापडला दुर्मिळ ऐतिहासिक शिवकालीन खजाना


रायगड – भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनास सुरुवात झाली असून काही भागात किल्ल्यावर या विभागामार्फत उत्खननास सुरुवात झाली आहे. आता या उत्खननात रायगडावरील दुर्मिळ ऐतिहासिक शिवकालीन खजाना हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. युद्धात वापरणारी शस्रास्रे, तोफेचे गोळे, जुने खिळे, बंदुकीच्या गोळ्या, नाणी यात सापडली आहेत.

पूर्वी सारखाच रायगड किल्ला हा दिसावा यासाठी शासनाने किल्ला संवर्धन प्रकल्प हाती घेतला असल्यामुळे किल्ला संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये रासायनिक प्रक्रिया करून किल्ला संवर्धन केले जात आहे. रायगड किल्ल्यावर काही भागात उत्खनन सुरू असून या भागात पूर्वी काय होते आणि जुन्या वस्तू मिळतात का? याचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खनन काम सुरू आहे. दीड फूट खोदल्यानंतर आता रायगडाची खरी दौलत बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.

तोफेचे गोळे, बंदुकीची काडतुसे, जुने खिळे, नाणी असा ऐतिहासिक ठेवा किल्ले रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात सापडलेला आहे. या सापडलेल्या ऐतिहासिक दुर्मिळ ठेव्यामुळे अजून काही प्रमाणात शिवकालीन खजाना उत्खननात सापडेल, अशी आशा शिवभक्त करीत आहे. तर सध्या सापडलेला दुर्मिळ ठेवा हा भारतीय पुरातत्व विभागाने एका ठिकाणी ठेवलेला आहे.