भारतात बीअरचा खप आशियात सर्वात कमी, पण मागणी वाढणार


संपूर्ण आशिया खंडात बीअरचा दरडोई खप भारतात सर्वात कमी असल्याचे नोंदवितानाच येत्या काळात मात्र बीअरची मागणी वाढणार असल्याचे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. बीएमआय रिसर्च या संस्थेने हा अहवाल प्रकाशित केला आहे. देशातील बदलती सांस्कृतिक मूल्ये आणि वाढत्या तरुण व श्रीमंत लोकांमुळे हा खप वाढेल, असे बीएमआयने म्हटले आहे.

भारतात 2018 या वर्षी अल्कोहोल मद्याचा दरडोई खप 5.1 लिटर एवढा असून आशिया खंडात हाच खप दरडोई 20.9 लिटर आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपरिक मूल्ये, परवाना आणि कठोर नियंत्रण, काही राज्यांमध्ये अल्कोहोल विक्रीवर असलेले निर्बंध आणि स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या मद्यांना पसंती यांमुळे हा खप कमी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

“वर्ष 2018 ते 2022 या दरम्यान सरासरी वार्षिक 6.9 टक्क्यांनी बीअरची विक्री वाढेल, असा आमचा अंदाज आहे. वर्ष 2017 मध्ये बीअरचा एकूण खप 4.7 अब्ज लिटर होता, तो 2022 पर्यंत 6.5 अब्ज लिटरपर्यंत जाईल,” असे बीएमआयने निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment