दिर्घकाळ स्मरणात राहिल अशी ‘हिचकी’


अभिनेत्री राणी मुखर्जी २०१४ ला प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’नंतर ४ वर्षांनी ‘हिचकी’तून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला दमदार अभिनय, उत्तम कथा आणि अचूक पटकथा अशी बलस्थाने असलेला हिचकी नक्कीच भावणारा आहे. आपल्या शिक्षकावर प्रत्येकाचे पहिले प्रेम (आदरयुक्त) असते. असा एक शिक्षक जवळपास सर्वांच्याच आयुष्यात असतो, जो त्याच्या व्यक्तिमत्त्वावर गहिरा प्रभाव टाकतो. वर्गात अभ्यासक्रम शिकवण्यापुरती शिक्षकांची भूमिका अलीकडील काळात मर्यादित झाली आहे. शिक्षक पगार आणि सौख्य याभोवती गुरफटून गेले आहेत. अशा सर्व शिक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालून त्यांच्यातील शिक्षक जागा करणारी या चित्रपटाची कथा आहे. एक शिक्षिका वैगुण्यावर मात करुन विद्यार्थ्यांचा खट्याळपणा सहन करून अनुकुल स्थितीत मुलांना उभे करते याची ही सुंदर काहणी आहे.

टयुरेट सिंड्रोम नावाचा मेंदूचा आजार नैना माथूर (राणी मुखर्जी) हिला असतो. तिला ज्यामुळे प्रत्येक वाक्यागणिक विचित्र प्रकारची उचकी येत असते. तिची शिक्षिका बनण्याची खूप इच्छा असते. तिला १८ ठिकाणी तिच्या वैगुण्यामुळे नाकारले जाते. पण, जिद्द नैना सोडत नाही. शेवटी तिला नोटकर्स हायस्कूल ही शाळा संधी देते. पण या संधीसोबत तिच्यासमोर खूप मोठे आव्हानही असते. कारण, तिला या शाळेतील सर्वात टारगट मुलांचा वर्ग देण्यात येतो. या वर्गातील मुले शिक्षकांना टिकूच देत नाही अशी त्यांची ख्याती असते. पण या मुलांशी सुत जुळवण्यात नैना यशस्वी होते का? तिला येणाऱ्या हिचकीमुळे काय होते? हे जर जाणून घ्यायचे असेल तर चित्रपटगृहातच जावे लागेल.

दिग्दर्शन उत्तम झाले असून शाळेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वेळ चित्रीत झालेल्या चित्रपटात समर्पक आणि वास्तववादी दृष्य आहेत. सामान्य कथेला किंचीत वेगळा टच विशेष करून गेला आहे. यापुर्वी अनेक चित्रपटांतून या चित्रपटातील प्रसंग पहायला मिळाले आहेत. पण, हळूवार येणारी निराळीच वळणे सुखद धक्के देतात.

अतिशय ताकदीने राणीने चित्रपट यशस्वी केला आहे. साधेपणा हे तिने निभावलेल्या पात्राचे वैशिष्ट्य आहे. ग्लॅमरचे शिखर अनुभवलेल्या राणीने अशी नॉन ग्लॅमरस भूमिका उत्तमपणे साकारली आहे. तिने कारकिर्दीच्या या वळणावर निवडलेला विषय दाद देण्याजोगा आहे. तसेच भूमिकेला तिने दिलेला न्याय प्रेक्षकांना राणीची ताकद दाखवणारा आहे. इतर सह कलावंतांना विशेषत्: शाळेतील १४ मुलांचा अभिनय चांगला झाला आहे. कारण अभिनयाची जुगलबंदी रंगली तरच प्रेक्षक खिळून राहतो. तसेच चित्रपटातील गाणी समर्पक आहेत. लक्षात राहिल असे गाणे यामध्ये नाही. पण, कथेला साजेशी नक्कीच आहेत. काही असले तरी राणीची हि हिचकी खूप वेळ स्मरणात राहील अशीच आहे.