आणखी एका हिरे व्यावसायिकाचा 824 कोटींचा घोटाळा


नीरव मोदी आणि गीतांजलि समुहाच्या मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणेच लेटर ऑफ अंडरस्टँडिंग (एलओयू) द्वारे 824 कोटींचा घोटाळा करून आणखी एका हिरे व्यावसायिकाने देशाबाहेर पलायन केले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियासह (एसबीआय) 14 बँकांना या घोटाळेबाजाने गंडा घातला आहे.

चेन्नईतील कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (केजीपीएल) या कंपनीने हा गंडा घातला आहे. एसबीआयसह अन्य बँकांनी केजीपीएलला 824 कोटींचे कर्ज दिले होते. नंतर हे कर्ज निष्क्रिय संपत्तीच्या (एनपीए) यादीत टाकण्यात आले. वर्ष 2008 पासून 10 वर्षांच्या अवधीत खोटे रेकॉर्ड आणि ताळेबंदाच्या माध्यमातून हे कर्ज उभे करण्यात आले. आता केजीपीएलचे संचालक भूपेंद्र कुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन हे दोघे देश सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. केजीपीएलला एसबीआयने 240 कोटी रुपये, पंजाब नेशनल बँकेने (पीएनबी) 128 कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाने 46 कोटी रुपये, आयडीबीआयने 49 कोटी रुपये, सिंडीकेट बँकेने 54 कोटी रुपये, युनियन बँकेने 53 कोटी रुपये, यूको बँकेने 45 कोटी रुपये, सेंट्रल बँकेने 22 कोटी रुपये, कॉर्पोरेशन बँकेने 23 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाने 32 कोटी रुपये, तमिळनाडु मर्केंटाइल बँकेने 27 कोटी रुपये, एचडीएफसीने 27 कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेने 27 कोटी रुपये आणि आंध्र बँकेने 32 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

Leave a Comment