राजा रवी वर्मा यांच्या’तिलोत्तमा’ला न्यूयॉर्कमध्ये पाच कोटींची किंमत


प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवि वर्मा यांनी चितारलेल्या ‘तिलोत्तमा’ला या पेंटिगला सोमवारी न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात 795,000 डॉलर (सुमारे 5 कोटी) एवढी किंमत मिळाली.

सोथबी संस्थेच्या आधुनिक आणि समकालीन दक्षिण आशियाई कलांच्या लिलावात हे चित्र विकले गेले. एका अनामिक खाजगी संग्राहकाने हे चित्र विकत घेतले आणि त्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजली. लीलावकर्त्यांच्या अपेक्षेपेक्षा ही किंमत खूप जास्त होती. विक्रेत्याच्या अंदाजानुसार या चित्राला 400,000 डॉलर ते 600,000 डॉलर एवढी किंमत मिळायची शक्यता होती, असे लाईव्हमंट संकेतस्थळाने म्हटले आहे.

तिलोत्तमा हे भारतीय पौराणिक कथांमधील अप्सरेचे चित्र असून त्यात ती अर्धनग्न आहे. तिने लाल साडी घातली असून ती स्वर्गाच्या दिशेने उड्डाण करत आहे. तिचा एक हात उंचावलेला असून दुसऱ्या हाताने साडी सावरली आहे.

हे चित्र 20 x 13.25 इंच आकारातील असून ते रवी वर्मा यांनी 1836 च्या सुमारास काढले होते. त्यांची स्वाक्षरी आणि अत्यंत पुसट झालेली तारीख चित्राच्या खालच्या डाव्या बाजूला दिसते, असे लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.

मार्च 2017 मध्ये सोथबीने रवी वर्मांचे शीर्षक नसलेले दमयंतीचे चित्र 12 लाख डॉलरला विकले होते.राजा रवि वर्मा हे भारतीय कलांच्या इतिहासातील सर्वात महान चित्रकार मानले जातात.