अबब! १ किलोचा बटाटा, पापडाच्या आकाराचे चिप्स


भोपाल कृषी वैज्ञानिकांनी सतत तीन वर्षाच्या संशोधनातून बटाट्याची एक वेगळीच जात विकसित केली आहे. या एका बटाट्यात संपूर्ण कुटुंबाची भाजी होऊ शकेल शिवाय यापासून पापडाच्या आकाराचे चिप्स तयार करता येतील. एका बटाट्याचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत आहे. पौष्टीकता आणि गुणवत्तेत हे बटाटे उत्तम दर्जाचे आहेतच पण सर्वसामान्य बटाट्याच्या पिकाला जेवढे पाणी लागते त्याच्या निम्म्या पाण्यात हे पिक घेता येते असे त्यांचे म्हणणे आहे.

नाबिबग केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेत हे बटाटे पिकविले गेले आहेत. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले गेले होते. डॉ. केव्हीएस राव या संदर्भात माहिती देताना म्हणाले यासाठी जे बियाणे वापरले गेले ते ३० ते ३५ ग्राम वजनाचे होते. बटाटे बियाणे पेरल्यावर त्यावर चमकदार काळे पोलीथीन झाकले गेले. जेथून रोप बाहेर आले तेथे पोलीथीनवर छेद दिले गेले. पाणी देताना त्यांतूनच द्रव स्वरुपात खते दिली गेली. १ दिवसाआड दोन तास पाणी दिले गेले. त्यामुळे योग्य तपमान राखले जाऊन बटाटे चांगले पोसले गेले. एका रोपाला अर्धा ते एक किलो वजनाचे १० ते १२ बटाटे आले.

या उत्पादनासाठी खर्च नेहमीच्या तुलनेत थोडा अधिक आला तरी उत्पन दुप्पट मिळाल्याने पैसे अधिक मिळाले. चार महिन्यात तयार होणाऱ्या या पिकापोटी शेतकरी एकरी अडीच ते पावणेतीन लाख रुपये मिळवू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.