गुगलची डुडलद्वारे उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना आदरांजली


मुंबई – आज प्रख्यात शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची १०२ वी जयंती आहे. या निमित्ताने बिस्मिल्ला खाँ यांना जायंट सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलने डूडलच्या माध्यमातून आपल्या होमपेजवर आदरांजली वाहिली आहे.

२१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डुमरांवमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म झाला. कमरुद्दीन हे त्यांचे मूळ नाव होते. मात्र पुढे त्यांच्या आजोबांनी ‘बिस्मिल्ला’ म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने जग त्यांना ओळखू लागले. धार्मिक सौहार्दाचे प्रतिक म्हणूनही बिस्मिल्ला खाँ यांना ओळखले जाते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरुंच्या उपस्थितीत उस्ताद बिसमिल्ला खाँ यांनी शहनाईचे वादन केले होते. त्याचसोबत, कान्स आर्ट फेस्टिव्हल, ओसाका ट्रेड फेअर, वर्ल्ड एक्स्पोझिशन, वर्ल्ड म्युझिक इन्स्टिट्युट इत्यादी अनेक सोहळ्यांमध्येही त्यांनी शहनाई वादन केले आहे.

त्यांच्या शेहनाई वादनाने (संग्रहीत संगिताने) भारतात १९५० पासून आजपर्यंत प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाची सुरुवात केली जाते आहे. तसेच त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे १९३७ साली कोलकात्यातील ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक व्यासपीठावरुन पहिल्यांदा शहनाईचे वादन केले. त्यानंतर त्यांनी वाद्यसंगीतात स्वत:ला झोकून दिले. ते आपल्या शहनाईला ‘बेगम’ म्हणत असत. बिस्मिल्ला खाँ यांचा २१ ऑगस्ट २००६ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला.

Leave a Comment