हासन येथील लक्ष्मी मंदिर

कर्नाटकच्या हासन जवळ बेलूर रस्त्यावर असलेले दोड्डागड्डवली मंदिर हे अतिशय सुरेख पण फारसे प्रसिद्ध नसलेले लक्ष्मी मंदिर होयसळ राजवटीत बांधल्या गेलेल्या ९२ मंदिरांपैकी एक आहे. या शैलीत बांधली गेलेली मंदिरे एक्कुत, द्विकुत, त्रिकुट, चतुष्कुट आणि पंचकुट प्रकारची असून मंदिराला किती कळस त्यावरून ती ओळखली जातात. हे महालक्ष्मी मंदिर चतुष्कुट पद्धतीचे आहे.

 

असे सांगतात की हे मंदिर १११४ मध्ये होयसळ राजवटीत त्या दरबारी असलेले कोल्हापूरचे एक व्यापारी कल्लाह्न राहूता यांनी बांधले. मंदिराला चार गोपुरे असून त्याला अभिनव कोल्हापूरम म्हणूनही ओळखले जाते. काळी, आदिशक्ती, महाशक्ती देवी येथे सौम्य स्वरुपात आहे. तिच्या पायाखाली शुम्ह्ब, निशुंभ राक्षस , दरवाज्यावर सप्त मातृका आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूनी नागकन्या, विषकन्या कोरलेल्या आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीप्रमाणे ही मूर्ती आहे. लक्ष्मीची मूर्ती सर्वसाधारण बैठ्या स्वरूपातील व हातात कमळ घेतलेली असते. ही मूर्ती उभी व हातात शंख, चक्र, गदा घेतलेली आहे त्यामुळे ती दुर्गा म्हणजे पार्वती असा तर्क केला जातो. याच मंदिरात कालभैरव, भूतनागेश्वर पिंडीही आहे. या ठिकाणी चोहोबाजूंनी देवतांच्या मूर्ती असल्याने देवासमोर नेहमी ज्या पद्धतीने पायावर बसून डोके टेकले जाते तसा नमस्कार करता येत नाही. कारण या स्थितीत कोणत्या ना कोणत्या देवाकडे भाविकाचे पाय वळतात.

Leave a Comment