शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रोबो लांडगा


हातातोंडाशी आलेल्या पिकांचे जनावरे आणि जंगली प्राण्यांनी नुकसान होणारा भारत एकमेव देश नाही तर जगभरातील शेतकरी या समस्येने हैराण आहेत. रोबो बनविण्यात जागतिक कौशल्य मिळविलेल्या जपानी संशोधकांनी शेतकऱ्यांना या समस्येपासून सुटका मिळवून देणारा एक अजब प्राणी तयार केला असून त्याचे नामकरण रोबो वूल्फ असे केले गेले आहे. दिसायला लांडग्यासारखा असणारा हा रोबो इतका भयंक दिसतो कि गाई, बैल, म्हशी, डुकरेच काय पण हत्तीसारखे जंगली प्राणी त्याला पाहून धूम ठोकत आहेत. या रोबो लांदाग्यांसाठी ५ हजार डॉलर्स मोजावे लागणार असले तरी शेतकरी तो भाडेतत्वावर घेऊ शकणार आहेत.

हा रोबो सौर उर्जेवर चालतो. रात्र दिवस तो पिकांचे अन्य प्राण्यांपासून संरक्षण करतो. त्याच्यावर बसविलेले सेन्सर त्याला प्राणी शेतात घुसत असल्याची माहिती पुरवितात. जळजळीत लाल भडक डोळे. उघडा भेसूर जबडा, अंगावर केसाळ त्वचा, १८० अंशात फिरू शकणारे डोके आणि विविध प्राण्याच्या आवाजात गुरगुर करण्याची क्षमता यामुळे अन्य प्राणी त्याच्याजवळ फिरकत नाहीत. त्याच्या अंगावर सेन्सर असल्याने शेतात थोडीजरी हालचाल झाली तरी हा रोबो लगेच कार्यरत होतो. त्याला मिळत असेलेल यश पाहून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment