अजयच्या दमदार अभिनयासाठी नक्की पहा ‘रेड’


काल बॉक्स ऑफिसवर अजय देवगण आणि इलियाना डीक्रूज अभिनित बहुचर्चित रेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा १९८१ साली लखनऊमध्ये घडलेल्या एका हाय प्रोफाइल छाप्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे.

अमय पटनायक (अजय देवगण) नावाचा निडर इनकम टॅक्स ऑफिसर या चित्रपटात खासदार रामेश्वर सिंह उर्फ राजाजी सिंह (सौरभ शुक्ला) च्या घरी आपल्या संपूर्ण टीमसोबत धाड टाकतो. ४२० कोटींचे काळे धन लपवण्यासाठी राजाजी त्याचा संपूर्ण जोर लावतो. अमयला तो धमकावतो, पण आपल्या कार्यात अमय चुकत नाही. अजयची पत्नी नीता (इलियाना डीक्रूज) वर हल्ला केला जातो. पण तरीदेखील नीता तिच्या नव-याला पाठिंबा देते. एका खासदाराच्या घरी धाड टाकणे अमयसाठी किती आव्हानात्मक असते, रेड टाकताना त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, तो त्याच्या कामात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरच गाठावे लागेल.

राजकुमार गुप्ता यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन ठिकाठाक केले आहे. चित्रपटातील आणखी काही सीन्स उत्तम चित्रीत करु शकले असते. दुसरीकडे चित्रपटाच्या कथेत अजय-इलियानाच्या रोमान्स सीन्स फिट बसत नाहीत. हे सीन्स कमी केले जाऊ शकले असते.
आपल्या भूमिकेला अजय देवगणने पुर्णपणे न्याय दिला आहे. तर खासदाराच्या भूमिकेत असणा-या सौरभ शुक्लानेही चांगले काम केले आहे. चित्रपटात रितेश शाहने लिहिलेले डायलॉग्सची चांगले आहेत. अजय आणि सौरभमधील डायलॉग डिलिवरीही शानदार आहे. अजय, सौरभच्या घरी ज्यावेळी रेड मारण्यासाठी जातो, तेव्हा सौरभ म्हणतो की, ‘इस घर में कई सरकारी अफसर मच्छर मारने नहीं आ सकता.. तुम रेड मारने आए हो, खाली हाथ जाओगे. यावर अजय ‘मैं बस ससुराल से शादी वाले दिन खाली हाथ लौटा हूं, वरना जिसके घर सुबह सुबह पहुंचा हूं कुछ लेकर ही आया हूं असे उत्तर देतो.

चित्रपटात अमित त्रिवेदी आणि तनिष्क बागचीने चांगले संगीत दिले आहे. रिलीज पुर्वीच यामधील ‘सानू एक पल चैन न आवे…’, ‘नित खैर मांगा…’ हे गाणे प्रसिध्द झाले होते. परंतू यूपी बॅकग्राउंडवर चित्रपटातील पंजाबी स्टाइल सॉन्ग फिट बसत नाही. अजय देवगणचे तुम्ही जर डायहार्ड फॅन असाल तर त्याच्या दमदार अभिनयासाठी चित्रपट बघा.