हे गैरसमज टाळा…


आपले शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहावे आणि काही समस्या आढळून आल्यास त्यावर वेळीच उपाययोजना केली जाणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी नियमित हेल्थ चेकअप्स करून घेणे अगत्याचे आहे. पण या बाबतीत अनेक जणांचे अनेक गैरसमज असल्याचे पाहायला मिळते. हे गैरसमज मनातून काढून टाकून वेळच्यावेळी हेल्थ चेकअप्स करवून घेणे आवश्यक आहे.

‘मी अगदी तरुण आहे, त्यामुळे मला मधुमेह कसा होईल? त्यामुळे तपासणीची काही आवश्यकता नाही ‘ असा ठाम विश्वास असणारी अनेक मंडळी आपल्याला आपल्या आसपास पाहायला मिळतात. वय तरुण असल्याने आपल्याला मधुमेह, ऑस्टीयोपोरोसीस, किंवा उच्चरक्तदाब होऊच शकत नाही हा गैरसमज आहे. उलट आजच्या बदलत्या काळातील जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अनियमित सवयी, व्यायामाचा किंवा विश्रांतीचा अभाव, मानसिक तणाव या मुळे हे रोग अगदी लहान वयामधेच उद्भवू लागले आहेत.

असे अनेक आजार आहेत, ज्यांची लक्षणे सुरुवातीच्या काळामध्ये दिसून येत नाहीत, पण त्यानंतर एकदा आजार बळावला, की मग त्यावर उपचार करणे कठीण होऊन बसते. त्यामुळेच नियमित चेकअप्स करून घेणे आवश्यक असते. एखाद्या आजाराबद्दल लोकांचे अनेक गैरसमज असतात. रोग केवळ म्हातारपणी उद्भवतात असा अनेक लोकांचा गैरसमज आढळून येतो. पण २५ ते चाळीस वयोगटातील लोकांच्या रक्ततपासणीमध्ये धोक्याची घंटा वाजताना पाहून देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करताना आढळतात.

अनेकदा मधुमेही व्यक्तींमध्ये असा गैरसमज आढळतो, की रक्ततपासणीपूर्वी दोन दिवस साखरेचे सेवन बंद केले की चाचणीचे रिपोर्ट नॉर्मल येतील. पण हा समज चुकीचा आहे. जर ब्लड शुगर लेव्हल्स मध्ये कोणत्याही प्रकारचे disturbances असतील, तर ते दाखवून देण्यासाठी ही रक्ताची तपासणी केली जाते. त्यामुळे आदल्या दिवशी गोड खाल्ले नाही तर रिपोर्ट्स नॉर्मल येतील यामध्ये अजिबात तथ्य नाही. त्याचप्रमाणे एक्स रे, सोनोग्राफी किंवा तत्सम चाचणी पद्धती गर्भवती महिलांकरिता धोकादायक आहेत हा ही गैरसमज मोठ्या प्रमाणावर आढळतो. असे नसून बाळाची वाढ बरोबर होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी या चाचण्या आवश्यक असतात.

Leave a Comment