ट्विटरने काढली हजारो ट्विटचोरांची खाती


इतरांचे ट्विट चोरून स्वतःच्या नावावर खपविणाऱ्या हजारो ट्विटचोरांची खाती ट्विटर या लोकप्रिय संकेतस्थळाने रद्द केली आहेत. रद्द केलेल्या खात्यांमध्ये अनेक प्रसिद्ध खात्यांचा समावेश आहे.

ही सर्व खाती ट्वीटचा मजकूर चोरून तो व्हायरल करण्याचे काम करत होते. कोणत्याही वापरकर्त्याचा मजकूर त्याची परवानगी न घेता व त्याला श्रेय दिल्याशिवाय वापरणे, याला ट्विटडेकिंग असे म्हणतात. तसेच एकमेकांच्या ट्वीटना रिट्वीट करून ते एकमेकांची प्रसिद्धी वाढवत होते. त्यासाठी ते लोकांकडून पैसेही घेत होते. असे करणाऱ्यांना ट्विटडेकर्स असे म्हणतात आणि ट्विटरच्या स्पॅपविरोधी धोरणाच्या ते विरोधात आहे. त्यामुळे ही खाती काढून टाकण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले.

सोडॅमट्र, गर्लकोड, डोरी, कॉमनव्हाईटगर्ल, होलीफॅगस टीनेजरनोट्स, फिनाह इ. अनेक खात्यांचा रद्द केलेल्या खात्यांमध्ये समावेश आहे.

ही सफाई मोहीम म्हणजे ट्विटरवरील स्पॅमशी लढा देण्याच्या कंपनीच्या व्यापक प्रयत्नांचा भाग होता, असे ट्विटरच्या प्रवक्त्याने हफिंग्टन पोस्टला शनिवारी सांगितले. “ट्विटरला सुरक्षित आणि स्पॅमपासून मुक्त ठेवणे याला आमच्यादृष्टीने सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ब्लॉगमध्ये म्हटले होते.

Leave a Comment