या किल्ल्यावर आहे आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ


जयपूर येथील जयगड या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ आहे. ह्या तोफेचा पल्ला इतका लांबवर आणि त्यामुळे होणारे नुकसान इतके भयाकारी होते, की ह्या तोफेच्या केवळ उल्लेखानेच शत्रूची भीतीने गाळण उडत असल्याचे म्हटले जाते. ही भली मोठी तोफ बनविण्याकरिता ईस १७२० साली या किल्ल्यावरच विशेष कारखाना तयार करण्यात आला.

हे तोफ ओतून तयार झाल्यानंतर ह्याची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तोफेमध्ये दारू ठासून जेव्हा त्याचा मारा करण्यात आला, तेव्हा त्या तोफेच्या गोळ्याने तब्बल पस्तीस किलोमीटरचा पल्ला गाठला. तो गोळा जिथे पडला तिथे जमिनीमध्ये एक भले मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्या विवारामध्ये पाणी साठत गेले. त्या विवराच्या ठिकाणी आता एक मोठा जलाशय पाहायला मिळतो.

ही तोफ जयगड किल्ल्यावर बनविली गेली, त्यामुळे या किल्ल्याच्या नावानारूनच या तोफेचे नामकरण करण्यात आले. या तोफेला जयबाण तोफ असे नाव देण्यात आले. आमेरच्या जवळ स्थित असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे. ही तोफ समस्त आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणूनही ओळखली जाते. दुसरे सवाई जयसिंह यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणाकरिता ह्या तोफेचे निर्माण करविले होते.

आरावली पर्वतराजीतील जयगड किल्ल्याच्या डुंगरी दरवाज्यावर उभ्या असलेल्या या तोफेची लांबी एकतीस फूट आहे. या तोफेच्या नळीचा व्यास अकरा इंच असून या तोफेसमोर एक भला दांडगा माणूस देखील लहानसा दिसतो, इतकी ही तोफ अजस्त्र आहे. ह्या तोफेचे वजन पन्नास टनापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. विशेष गोष्ट ही की या तोफेच उपयोग आजवर एकाही युद्धामध्ये केला गेला नाही. पस्तीस किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या ह्या तोफेमध्ये शंभर किलो गन पावडरची आवश्यकता पडत असे. ह्या तोफेच्या महाकाय आकारामुळे या तोफेला किल्ल्यावरून उतरून युद्धामध्ये नेता येणे शक्य झाले नाही.

Leave a Comment