अॅक्सिस बँक करणार व्हाट्सअॅपवरून पेमेंट


लोकप्रिय चॅटिंग अॅप असलेल्या व्हाट्सअॅप आता लवकरच लोकांना पेमेंटशी संबंधित व्यवहार करता येणार आहेत.

“युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही एक मोठी संधी आहे आणि त्यातील नाविन्यतेच्या संदर्भात आम्ही बाजारपेठेत अग्रणी आहोत. तसेच ग्राहकांना पेमेंट करता यावेत यासाठी गुगल, व्हाट्सअॅप, उबेर, ओला आणि सॅमसंग यासांरख्या भागीदारांसोबत काम करत आहोत,” असे अॅक्सिस बँकेचे रिटेल बँकिंगचे कार्यकारी संचालक राजीव आनंद यांनी बुधवारी सांगितले.

“व्हाट्सअॅपच्या संदर्भात आम्ही इंटिग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत. व्हाट्सअॅप हे सध्या बीटा आवृत्ती चालवत आहे आणि येत्या एक दोन महिन्यात त्याची संपूर्ण आवृत्ती येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

यूपीआयच्या बाजारपेठेत अॅक्सिस बँकेचा वाटा 20 टक्के एवढा आहे. तसेच बँकेने गुगल तेजवरून पेमेंट व्यवहार करण्यास अगोदरच सुरूवात केली आहे, असेही आनंद यांनी सांगितले.

यूपीआयवर आधारित आपली स्वतःची पेमेंट सुविधा सुरू करणार असल्याचे सूतोवाच व्हॉट्सअॅपने नुकतीच दिली होती. देशातल्या काही प्रमुख बँकांच्या सहकार्याने व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सुविधा सुरू करणार आहे. डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा तपासण्या होताच मोजक्या वापरकर्त्यांच्या माध्यमातून त्याची अंतिम चाचणी सुरू होईल. त्यानंतर हे फिचर सर्वांसाठी खुले होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Leave a Comment