घर प्रशस्त दिसावे या करिता काही टिप्स


जर आपले घर, विशेषकरून बैठकीची खोली प्रसन्न, प्रशस्त दिसावी असे वाटत असेल, तर बोजड फर्निचर, गडद रंगांचे पडदे, जाडजूड कार्पेट्स, किंवा सतरंज्या यांचा वापर करणे टाळावे. घर किंवा खोली मोठी दिसण्यासाठी त्यामध्ये सामानाची गर्दी असू नये. बोजड फर्निचर वापरण्याऐवजी मल्टी फंक्शनल फर्निचर वापरणे चांगले. आजकाल बाजारामध्ये असे फर्निचर उपलब्ध आहे, ज्याचा वापर निरनिराळ्या पद्धतीने करता येतो. तसेच, फर्निचर ‘स्लीक’ असावे. खोलीमध्ये फर्निचर जितके कमी तितकी खोली अधिक प्रशस्त वाटते. त्यामुळे एकाच खोलीमध्ये फर्निचरची गर्दी न करता आवश्यक तेवढे फर्निचर असावे, आणि त्याची मांडणी देखील विचारपूर्वक करावी.

पडदे जास्त गडद रंगांचे न वापरता, हलक्या रंगांचे वापरावेत. फ्लोरल प्रिंट असलेले पडदे किंवा फर्निचरची अपहोल्स्ट्री ( कव्हरे ) यांच्या वापरामुळे खोली जास्त मोकळी वाटते. तसेच खोलीमध्ये जाडजूड गालिचे, रग्स असल्यास खोली खूप भरलेली आणि लहान दिसते. त्यामुळे गालिचे किंवा रग्सचा उपयोग करणे टाळावे. जर गालिचा वापरायचाच असेल, तर आकाराने लहान आणि हलक्या रंगाचा गालिचा वापरावा.

खोलीच्या भिंतींसाठी हलक्या, पेस्टल रंगांची निवड करावी. स्टेटमेंट वॉल करायची असल्यास किंवा एखादी भिंत हायलाईट करायची असल्यास त्यासाठी देखील हलक्या रंगांच्या कॉम्बिनेशन्सचाच वापर करावा. भिंतींना गडद रंग दिल्याने खोली अंधारी व लहान दिसते. त्याउलट जर हलक्या रंगांचा वापर केला, तर खोली जास्त प्रशस्त, खुली आणि प्रकाशमान दिसते.

बेडरूम किंवा आपल्या विश्रांती घेण्याच्या खोलीमध्ये बेडच्या आसपास किंवा खाली फार समान ठेऊ नये. तसेच बेड सुंदर दिसावा म्हणून अनेक रंगांची, आकाराची कुशन्स ठेवणे टाळावे. बेडवर केवळ, दोन उश्या आणि आवश्यक असल्यास दोन कुशन्स ठेवावीत. आपण वापरत असलेली पांघरुणे बेडवरच ठेवायची असतील, तर त्यांची नेटकी घडी बेडवर असावी. तसेच भिंतींवर फार जास्त फोटो फ्रेम्सची गर्दी असू नये.

घरामध्ये शोभेच्या वस्तू जमिनीवर ठेवल्याने पुष्कळ जागा अडते, व त्यामुळे खोली लहान दिसू लागते. त्यामुळे शोभेच्या वस्तू जमिनीवर ठेवण्याऐवजी भिंतींवर डेकोरेटिव्ह शेल्फ लावून, त्यावर वस्तूंची मांडणी करावी. अन्यथा एक शोकेस-वजा शेल्फ घेऊन त्यामध्ये शोभेच्या वस्तूंची केलेली मांडणी आकर्षक दिसते. सोबत निवडक पुस्तके, एखादेच आकर्षक पेंटिंग किंवा वॉल हँगिंग यांच्यामुळे खोली आणखीनच सुंदर दिसू लागते.

Leave a Comment