प्रथमग्रासे मक्षिकापात:


एखादा माणूस आवडीने आणि मोठ्या चोखंदळपणाने जेवायला बसावा पण त्याच्या पहिल्याच घासाला खडा लागावा किंवा पहिल्या घासाला माशी लागावी अशी नरेश अग्रवाल यांची अवस्था झाली आहे. ते काल समाजवादी पार्टीतून भाजपात आले आणि आपण हे पक्षांतर का केले आहे याचे विवरण करताना ते महिला वर्गाला आणि कलावंतांना बोचेल असे विधान करून गेले. त्यामुळे सर्वसाधारण सगळ्याच राजकीय क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात आलीच पण भारतीय जनता पार्टीतही त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटले. त्यामुळे त्यांना भाजपात आल्याच्या पहिल्याच दिवशी दिलगिरी व्यक्त करावी लागली.

त्यांनी भाजपात येण्याचे कारण सांगताना समाजवादी पार्टीने आपल्याऐवजी जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवले असल्याचे म्हटले पण ते सांगताना त्यांनी, जया बच्चन यांचा उद्धार सिनेमात काम करणारी आणि नाचणारी बाई असा केला. जया बच्चन यांना उमेदवारी दिल्याचा राग असणे साहजिक आहे पण ते कारण सांगताना त्यांनी शब्द थोडे जपून वापरायला हवे होते. पण सध्या नेत्यांना काय झाले आहे हे काही समजेनासे झाले आहे. अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला याचे स्वागत करणार्‍या प्रत्येक भाजपा नेत्यांनी स्वागतही केले आणि त्याला जोडून लगेच आपल्या या नव्या नेत्याचा धि:कारही केला. असा प्रसंग आजवर कोणा नेत्यावर आला नसेल.

मुळात नरेश अग्रवाल यांना भाजपात घेतले हीच एक चूक आहे कारण ते उत्तर प्रदेशातल्या आयाराम गयाराम प्रवृत्तीचे अग्रणी नेते आहेत. ते पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. तिथून बाहेर पडून त्यांनी जगदंबीप्रसाद पाल यासारख्या सतत पक्षांतरे करणार्‍या नेत्यासोबत एक स्वतंत्र पक्ष काढला. तिथून ते समाजवादी पार्टीत गेले आणि आता तिथून राज्यसभेची उमेदवारी मिळत नाही असे दिसताच भाजपात उडी मारली आहे. त्यांना भाजपात घेण्याचा निर्णय अमित शहा यांना विचारूनच घेतला असणार पण भाजपाच्या अनेक नेत्यांना अग्रवाल आपल्यात नको आहेत कारण ते भाजपात नव्हते तेव्हा भाजपा, हिंदूधर्म, राममंदिर यासंबंधी अतीशय स्फोटक भाषेत बोलत असत. अर्थात एकदा एखाद्या नेत्याला आत घ्यायचेच ठरल्यावर त्याने पूर्वी काय केले आहे हे विसरावेच लागते पण अग्रवाल हे काही कारण नसताना भाजपावर अतीशय शिवराळ भाषेत टीका करत असत. ती टीका क्षम्य नाही.