महिलांना रेल्वेत मिळणार ‘ही’ खास सुविधा


नवी दिल्ली : महिला प्रवाशांना भारतीय रेल्वे प्रशासनाने एक खुशखबर दिली असून महिलांसाठी रेल्वेकडून एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार रेल्वे बर्थवरून महिलांना होणा-या समस्येतून सुटका मिळणार आहे.

रेल्वेकडून आता महिलांसाठी लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला असून विविध कोचमध्ये महिलांसाठीच्या लोअर बर्थची संख्या निश्चित करण्यात आली आहे. याबाबत भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलांसाठी मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या सर्वच स्लीपर क्लासच्या कोचमध्ये सहा-सहा बर्थ आरक्षित केले जातील. ही सुविधा सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर लागू केली जाणार आहे. त्यासोबतच गरीब रथच्या एसी-३ कोचमध्येही सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या थर्ड एसी-सेकेंड एसी कोचमध्ये ३-३ बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत.

राजधानी आणि दुरोंतोसोबतच पूर्णपणे एसी रेल्वेच्या एसी-३ मध्ये चार लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. आयटी शाखा क्रिसकडून महिला प्रवाशांसाठी लोअर बर्थ निश्चित करण्यासाठी रिझर्वेशन सिस्टममध्ये नवीन सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे.

Leave a Comment