Skip links

दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास : गिरीश बापट


मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा केली असून तीन वर्षांचा कारावास दूध भेसळ प्रकरणातील दोषींना होणार आहे.

गिरीश बापट यांनी ही घोषणा दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना केली. दूध भेसळखोरांना सध्या सहा महिन्यांची शिक्षा आहे. पण या प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा असल्यामुळे लगेच जामीन होतो. तीन वर्षांपर्यंत ही शिक्षा वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असे बापट यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

तर अनेक आमदारांनी विधानसभेत दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी केली. पण जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले. सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात चार मोबाईल व्हॅन आहेत. पण या व्हॅनद्वारे ज्या सातत्याने तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याची कबुली बापटांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल असेही ते म्हणाले.

यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल, अशी ग्वाही यावेळी गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. मुंबईत येणाऱ्या दुधाच्या गाड्या तसेच राज्यातील काही भागातील गाड्या अचानक या मोबाईल व्हॅनद्वारे तपासण्यात येतील असेही बापट यांनी सांगितले.

Web Title: Three years imprisonment for culprits in milk adulteration: Girish Bapat