आधार सक्तीपासून ३१ मार्चपर्यंत सुटका


नवी दिल्ली – बँक खाते व मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ही मुदतवाढ पुढील निर्णय येईपर्यंत असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने त्यावर ही मुदतवाढ दिली. याप्रकरणी कोणावरही सरकार बळजबरी करू शकत नाही असे मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोंदवले.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व योजना आणि अन्य बाबींसाठी हा आदेश लागू असेल. सध्या आधारशी केंद्र सरकारच्या १३१ कल्याणकारी योजनांना जोडण्यात आल्या असून काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठाने खासगीपणाचा हा घटनात्मकदृष्टय़ा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आधारमुळे या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या. त्यापैकी काही याचिकाकर्त्यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाशी जोडणे घटनाबाह्य़ असल्याचे म्हटले होते.