एआयबी प्रकरणी रणवीर, अर्जुनला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार


मुंबई : एआयबीप्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरला तात्काळ दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण तक्रारदारांना या याचिकेची प्रत न दिल्यामुळे उच्च न्यायालयने याप्रकरणी मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार देत, याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे डिसेंबर २०१४मध्ये आयोजित एआयबी रोस्ट या कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत अत्यंत बिभस्त आणि कमरेखालचे विनोद करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ता आभा सिंह यांनी याप्रकरणी जोरदार विरोध करत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारदार संतोष दौंडकर यांनी गिरगाव न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने फेब्रुवारी २०१५मध्ये यासंदर्भात मुंबई पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले होते.