दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर अघोरी उपाय


पुणे – पुण्यातील प्रतिष्ठित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जादूटोणा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आयसीयूमधील एका रुग्ण महिलेवर डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीमध्ये जादूटोणा केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संबंधीत रुग्ण महिलेचे निधन झाले आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून या प्रकरणाचा रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वारगेट येथील एका रुग्णालयात ही महिला उपचार घेत होती. पण प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. महिलेला याच रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीत रुग्ण महिलेवर तंत्र-मंत्र करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला आहे. दरम्यान, या रुग्ण महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.