सीआयडीमार्फत होणार विश्वास पाटलांची चौकशी !


मुंबई: गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडी करणार असून याप्रकरणातील १३७ पैकी ३३ फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर रवींद्र वायकर यांनी विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाली असल्याची धक्कादायक माहिती दिली. याबाबत निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.

SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्ती आधी अक्षरशः धुमाकूळ घालत विकासकांना हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका, चौकशी समितीने ठेवला आहे. अनेक गंभीर आरोप पाटील यांच्यावर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने यापूर्वी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता.त्यानंतर या समितीला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या समितीने आपल्या अहवालात विश्वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्तीआधी घातलेला धुमाकूळ स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.