योगी आदित्यनाथांकडून हवी अबू सालेमला मदत


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमने पत्र लिहिले असून अबू सालेमने लिहिलेल्या पत्रात आपली वारसाहक्काने मिळणारी जमीन काही लोकांनी जबरदस्तीने बळकावली असल्याचा आरोप करत मदत मागितली आहे. अबू सालेमच्या पूर्वजांची उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात जमीन आहे. पत्रात अबू सालेमने लिहिल्याप्रमाणे, जमिनीचा तुकडा जो आपल्या आणि भावाच्या नावे आहे तो सहा लोकांनी बळकावला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अबू सालेमने पत्राच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत सालेमचे वकिल राजेश सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, योगी आदित्यनाथ यांच्यासहित पोलिसांनाही अबू सालेमने पत्र लिहिले आहे. पोलिसांनी जर याबाबत काही कारवाई केली नाही, तर कलम १५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सिंह बोलले आहेत.

पत्रात अबू सालेमने म्हटले आहे की ३० मार्च २०१३ ला हाती आलेल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये माझे आणि माझ्या भावाचे नाव होते. पण ६ डिसेंबर २०१७ला त्यात बदल करुन नावे बदलण्यात आली. अबू सालेमने ज्या सहा जणांवर आरोप केले आहेत त्यांची नावे मोहम्मद नफीस, मोहम्मद शौकत, मोहिउद्दीन, अखलाक, नदीम अख्तर आणि सरवरी अशी असून आपली जमीन बळकावण्याचा हे लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप अबू सालेमने केला आहे. पोलिसांनी तपास केला असता, जमिनीचे मालकीहक्क २००२ पासून दुस-या व्यक्तीकडे असून सध्या त्या ठिकाणी मॉलचे बांधकाम सुरु आहे.